Gujarat Crime : काही महिन्यांनीच देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण होणार आहेत. मात्र अद्यापही देशाच्या नागरिकांना समान अधिकारांसाठी झगडावं लागत आहे. देशात अद्यापही जात, धर्मावरून सातत्याने वाद होताना दिसतायत. उद्योगांमध्ये प्रगत अशा राज्यांमध्येही ही प्रकार वारंवार घडताना दिसतायत. अशातच गुजरातमध्ये (Gujarat News) चांगले कपडे घातल्याने एका अनुसुचित जातीच्या दोघांना मारहाण झाल्याचे समोर आले आहे. आई आणि मुलाला मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी (Gujarat Police) दिली आहे. दोघांना इतकी जबर मारहाण करण्यात आली की त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्याच्यया पालनपूर तालुक्यातील मोटा गावात हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चांगले कपडे  आणि चष्मा घातलेल्या अनुसुचित जातीच्या माणसाने काही उच्चवर्णीय लोकांनी जबर मारहाण केली. लोकांनी त्या व्यक्तीसह त्याच्या आईलाही मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा सर्व प्रकार मंगळवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलगी आणि तिच्या आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.


पीडित व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मी आणि माझ्या आईने चांगले कपडे घातले आणि चष्मा घातल्यामुळे आमच्यावर नाराज होते. मंगळवारी सकाळी आम्ही घराबाहेर उभे असताना सातपैकी एक आरोपी आमच्याजवळ आला आणि त्याने शिवीगाळ केली. आजकाल तू खूप उंच उडत आहे, असे सांगून त्या आरोपीने  मला जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारदाराने म्हटलं आहे.


त्याच दिवशी रात्री एका समाजातील सहा आरोपींनी त्या व्यक्तीला गावातील मंदिराबाहेर उभे असलेले पाहिले. त्यानंतर लाठ्या-काठ्या घेऊन पीडित व्यक्तीकडे गेले आणि तू चांगले कपडे आणि गॉगल का घातला, असे विचारले. त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण करून डेअरी पार्लरच्या मागे ओढत आणले अशी गुजरात पोलिसांनी सांगितले. पीडित व्यक्तीची आई मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडली तर आरोपींनी तिलाही मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांचे कपडे देखील फाडले.


दरम्यान, पीडित व्यक्तीकडून तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दंगल, बेकायदेशीरपणे एकत्र येणे, महिलेचा विनयभंग करणे, स्वेच्छेने दुखापत करणे, अपशब्द वापरणे या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी सांगितले. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.