Gujarat Love Story : प्रेम आणि त्यानंतर प्रेमविवाहाला आजही समाजात अनेक ठिकाणी गुन्हा म्हणून पाहिले जाते. त्यातही जर मुलगी दुसऱ्या जाती, धर्मातल्या मुलासोबत लग्न करत असेल तर घरच्यांना मोठा धक्का बसतो. राग, अपमानाच्या भरात घरची मंडळी नको ते कृत्य करुन बसतात. गुजरातमधील दाहोद येथे असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे प्रेमविवाहाशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पित्याने आपल्या जिवंत मुलीवर अंत्यसंस्कार केले. या आश्चर्यकारक प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील दाहोद येथील एक तरुणीचे तिच्या मित्रासोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरु होते. मुलीच्या कुटुंबीयांना सुरुवातीला याची अजिबात कल्पना नव्हती.  मुलगी ब्राह्मण कुटुंबातील होती तर मुलगी ज्या मुलावर प्रेम करत होती तो दुसऱ्या जातीचा होता. त्यामुळे आपले हे नाते कुटुंबीय कधीच स्वीकारणार नाहीत, याची मुलीला जाणिव होती.


एके दिवशी मुलगी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली पण घरी परतली नाही. मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने चिंतेत असलेल्या वडिलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली. बराच शोध घेतल्यानंतर जेव्हा मुलीच्या शोधाची बातमी आली तेव्हा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.


मुलीने घरच्यांना न सांगता लग्न केले होते. वडील पोलिसांसह मुलीकडे पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी मुलीला हे लग्न मोडून स्वत:सोबत घरी येण्यास सांगितले. पण मुलगी आपल्या निर्णयावर ठाम राहिली.  तिने वडिलांसोबत जाण्यास नकार दिला. वडिलांच्या सर्व प्रयत्नांनंतरही मुलगी सोबत न आल्याने वडील घरी परतले. तरुणी प्रौढ असल्याने पोलिसांनाही तिच्यावर दबाव टाकता आला नाही. 


घरी परतल्यानंतर संतापलेल्या वडिलांनी धक्कादायक पाऊल उचलले. वडिलांनी मुलीशी सर्व संबंध तोडले. त्यांनी आपल्या जिवंत मुलीचे अंतिम संस्कार केले. पुन्हा कधीही मुलीचे तोंड न पाहण्याची शपथ त्यांनी घेतली. गुजरातमधील दाहोदमध्ये ही बाब चर्चेचा विषय बनली आहे.