मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपला भरभरून जागा दिल्या होत्या. मात्र, जनतेने एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरविलेत. भाजपला १००चा आकडाही गाठता आला नाही. ९९ चा आकडा गाठताना दमछाक झाली. त्यामुळे जनमत चाचण्यांचा अंदाज चुकल्याचे दिसून आलेय.


एक्झिट पोलला झटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांना चांगलाच झटका बसलाय. निकालानंतर एक्झिट पोलचे अंदाज चुकल्याचे स्पष्ट झाले आहे. 


निवडणूक आयोगाकडून लगाम 


दरम्यान, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने जरी विजय मिळवला तरी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविलेल्या जागा जिंकण्यात भाजपला अपयश आलेय. प्रारंभीच्या काळात मतदानापूर्वीच कोणता पक्ष किती जागा जिंकेल याबाबतची आकडेवारी देण्यास विविध वृत्तवाहिन्यांमध्ये चढाओढ दिसून येत होती. त्याला निवडणूक आयोगाने लगाम घातला होता.


भाजपला भरभरुन जागा, पण


मात्र, या एक्झिट पोलचा हा प्रत्यक्ष मतदानावर परिणाम होण्याच्या शक्यतेने मतदान झाल्यानंतरच मतदानोत्तर चाचण्या जाहीर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. या भाजपला भरभरुन जागा देण्यात आल्या होत्या.



यापैकी गुजरातमध्ये इंडिया टुडेचा, अ‍ॅक्सिस माय इंडियाचा आणि झी न्यूज-अ‍ॅक्सिसचा अपवाद सोडला तर इतर वाहिन्यांचा अंदाज सपशेल चुकल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. इंडिया टुडे, अ‍ॅक्सिस माय इंडिया आणि झी न्यूजने भाजपला ९९ ते ११३ जागा, काँग्रेसला ६८ ते ८२ जागा आणि अन्य १ ते ४ जागांचे भाकीत केले होते. याच्या आसपास निकाल लागला. 


यांचा अंदाज चुकला


मात्र, टाइम्स नाऊ, इंडिया टीव्ही, एबीपी, न्यूज २४-चाणक्य यांच्या मतदानोत्तर चाचण्यांना मतदारांनी अंदाज साफ चुकवलाय. टाइम्स नाऊने भाजपला ११३, काँग्रेसला ६६ व अन्य ३ असा अंदाज वर्तविला होता. 


इंडिया टीव्हीने भाजपला १०४ ते ११४, काँग्रेसला ६५ ते ७५ तर अन्य ४ असा अंदाज वर्तविला होता. एबीपीने भाजपला ११७, काँग्रेसला ६४ जागा वर्तविल्या होत्या. तर न्यूज २४-चाणक्यने भाजपला चक्क १३५ जागा व काँग्रेसला केवळ ४७ जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला होता.


हिमाचल प्रदेश अंदाज


हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला विजय मिळाला तरीही सर्वानीच भाजपला ६८ पैकी ५० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, भाजपला ४१ जागांवरच समाधान मानावे लागलेय.


इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाने भाजप ४७ ते ५५ ,काँग्रेस १३ ते २० जागांचा अंदाज वर्तविला होता. तर टाइम्स नाऊने भाजप ५१, काँग्रेस १७ व न्यूज २४-चाणक्यने भाजपला ५५, तर काँग्रेसला १३ जागा मिळणार असल्याचे भाकीत केले होते.