आयुष्याला कंटाळल्याचा `व्हॉटसअप` मॅसेज करत व्यापारी बेपत्ता
व्ही जी सिद्धार्थ आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच नवीन पटेल बिहारच्या रांचीमधून अचानक बेपत्ता झाल्याचं समोर आलंय
गुजरात : गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील रहिवासी असलेला एक लाकडाचा व्यापारी बेपत्ता असल्याचं प्रकरण समोर येतंय. व्हॉटसअपवर मॅसेज केल्यानंतर हा व्यापारी बेपत्ता झालाय. या व्यापाऱ्याचं नाव नवीन पटेल असं आहे. त्यानं धाडलेल्या व्हॉटसअप मॅसेजमुळे तो अतिशय तणावाखाली असल्याचं समोर येतंय. यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. याच आठवड्यात सोमवारी 'सीसीडी'चे मालक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई व्ही जी सिद्धार्थ बेपत्ता झाले होते. बुधवारी सकाळी नेत्रावती नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळला. हे प्रकरण ताजं असतानाच नवीन पटेल बिहारच्या रांचीमधून अचानक बेपत्ता झाल्याचं समोर आलंय.
अखेरचा मॅसेज
'भगवान भाई मी आत्महत्या करतोय. आयुष्याला कंटाळलोय. सकाळी ध्रुव आणि जसूला (पत्नी) आपल्या घरी घेऊन जा. रांचीमध्ये एखाद्या जागी आत्महत्या करेल. मी माझ्या मुलाचं आणि पत्नीचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंय' असा मॅसेज नवीन पटेलनं आपल्या मेव्हण्याला बेपत्ता होण्यापूर्वी ३० जुलै रोजी धाडला होता.
'आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही, त्यामुळे मी हे पाऊल उचलतोय. जसूनं मला खूप सांभाळलं पण, आता मात्र जगण्यासाठी माझी वेळ चांगली नाही. मला अनेक लोकांनी स्वार्थासाठी वापरलंय. तुम्ही मला हृदयापासून आपलसं केलंत त्यामुळे हे नातं पूर्ण आहे. ध्रुव, बंटी आणि जसूची काळजी घ्या. त्यांना योग्य मार्ग दाखवा. दोन्ही मुलं माझ्यासाठी देव आहेत. मी त्यांना कोणताही योग्य मार्ग दाखवू शकलो नाही... काय करू... बस... बाय... नवीन पटेल' असं नवीन पटेल यानं आपल्या मॅसेजमध्ये म्हटलंय.
हा मॅसेज वाचल्यानंतर नवीनच्या कुटुंबीयांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा फोन बंद येतोय.
'एनआयए'कडून नोटीस
व्यापारी असलेल्या नवीन पटेल याला राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडून एक नोटीस मिळाली होती. या नोटिशीत नवीनला रांचीच्या एनआयए ऑफिसमध्ये आपला जबाब देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. यानंतर नवीननं २७ जुलै रोजी रांचीच्या एनआयए ऑफिसमध्ये आपला जबाबदेखील नोंदवला. त्यानंतर ३० जुलै रोजी दुपारी ४.०० वाजल्याच्या दरम्यान त्यानं हा व्हॉटसअप मॅसेज पत्नी जयश्री पटेल आणि मेव्हणा भगवान पटेल यांना धाडला.
काय आहे प्रकरण?
यासंदर्भात 'झी मीडिया'च्या टीमनं नवीनच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यावेळी, २०१६ साली एका नक्षलवादी संघटनेचे २५ लाख रुपये रोकड पकडण्यात आली होती. या प्रकरणात एनआयएनं नवीन पटेल याला आपला जबाब देण्यासाठी बोलावलं होतं, असं कुटुंबीयांनी म्हटलंय.
नवीन पटेल हा एनआयएच्या चौकशीला कंटाळला होता की एखाद्या नक्षलवादी संघटनेकडून त्याला त्रास दिला जात होता? हे मात्र अजून समजलेलं नाही.