गुजरातमध्ये काँग्रेसचे ३ आमदार भाजपात
गुजरातमध्ये ३ आमदार भाजपात गेले आहेत. काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.
अहमदाबाद : गुजरातमध्ये ३ आमदार भाजपात गेले आहेत. काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे. शंकरसिंह वाघेला, यांच्यानंतर काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे, वाघेला समर्थक तीन आमदारांनी आज तडकाफडकी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या राजीनामानाट्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या चिंतेत भर पडली आहे.
वाघेला समर्थक आणखी काही आमदार काँग्रेसमध्ये असून क्रॉस व्होटिंगचाही धोका पटेल यांच्यापुढे आहे.अहमद पटेल यांनी गुजरातमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशावेळी तीन आमदार घटल्याने पटेल यांना पडणाऱ्या मतांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिल्यानंतर हे तीनही आमदार थेट भाजप गांधीनगर कार्यालयातच प्रकटले. तिथे त्यांच्या भाजपप्रवेशाचे सोपस्कारही लगेचच पार पाडण्यात आले.दरम्यान, बलवंतसिंह राजपूत, डॉ. तेजश्री पटेल आणि पी. आय. पटेल अशी राजीनामा देणाऱ्या तीन आमदारांची नावे आहेत.