गुजरातची निवडणूक ठरवणार पुढचा पंतप्रधान
भाजपनं संघटनात्मक रचनेवर भर दिलाय. तर काँग्रेसनं जातीय समीकरणाची मोट बांधून बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
अहमदाबाद : हिमाचल प्रदेशचं मतदान आटोपल्यानंतर आता देशाचं सर्व लक्ष लागलंय ते गुजरातच्या रणसंग्रामाकडे. भाजप आणि काँग्रेसनं गुजरातची सत्ता काबिज करण्यासाठी कमालीची रणनिती आखलीय.
भाजपचा संघटनात्मक रचनेवर
भाजपनं संघटनात्मक रचनेवर भर दिलाय. तर काँग्रेसनं जातीय समीकरणाची मोट बांधून बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
लक्ष सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीकडे
साऱ्या देशाचं लक्ष सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. 2019 मध्ये हे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील की नाही, याचा फैसला गुजरातची जनता करणार आहे. त्यामुळं भाजप अध्यक्ष अमित शाहांनी भाजपच्या विजयासाठी गुजरातमध्ये 10 हजार शक्तीकेंद्र तयार केली आहेत.
गुजरातमध्ये 4 कोटींपेक्षा जास्त मतदार
गुजरातमध्ये 4 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. 50 हजारपेक्षा जास्त पोलिंग बुथ तयार करण्यात आले आहेत. भाजपनं पाच पोलिंग बुथसाठी एक शक्तिकंद्र तयार केलंय. एका शक्तिकेंद्रात पाच बूथ अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.
भाजपचेही जोरदार प्रयत्न
या बुथ अध्यक्षांच्या मदतीला 10 ते 15 पेज प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. आणि या एक पेज प्रमुखाकडे 48 मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे.
अमित शाह स्वत: गुजरातच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन शक्ती केंद्रचे अध्यक्ष आणि पेज प्रमुखांच्या बैठका घेत आहेत.
दुसरीकडे काँग्रेस दोन आघाड्यांवर काम
तर दुसरीकडे काँग्रेस दोन आघाड्यांवर काम करत आहे. पहिल्या खेळीनुसार राहुल गांधींनी गुजरातच्या मंदिरांना भेटी दिल्या आणि सॉफ्ट हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातला. तर दुसरीकडे जातीय समीकरणं जुळवण्याची खेळी राहुल गांधींनी खेळत आहेत.
हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवानी
पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, ओबीसींचे नेते अल्पेश ठाकूर आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांच्या माध्यमातून बेरजेच्या राजकारणाची मोट बांधत आहेत. याला उत्तर देण्यासाठी भाजपनंही 100 पेक्षा जास्त दलित खासदारांना गुजरातच्या प्रचार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळं आता कुणाची रणनितीला गुजरातची जनता साथ देणार याकडे देशाचे लक्ष लागलंय.