नवरात्रीत गरबा खेळताना 24 तासात 10 लोकांचा मृत्यू, गुजरातमधली धक्कादायक घटना
Gujrat Navratrotsav : गुजरातमध्ये सध्या नवरात्रौत्साची धुम आहे. पण यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या चोवीस तासात गुजरातमध्ये तब्बल 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Gujrat Navratrotsav : गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव (Navratri 2023) मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. संपूर्ण गुजरात राज्यात सध्या युवा वर्ग गरब्याच्या रंगात रंगलाय. पण यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल 10 जणांचा मृत्यू झालाय. गरबा खेळतना हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याने हे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलीय. ताज्या प्रकरणात गुजरातमधल्या कपडवंज भागात गरबा खेळताना एका 17 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. वीर शाह असं या तरुणाचं नाव होतं, वीरला हार्ट अटॅक आला आणि त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं.
कपडवंज इथल्या गरबा ग्राऊंडमध्ये ही घटना घडली. वीर शाहला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचाराआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती. वीर शाह शारीरिक दृष्ट्या एकदम तंदरुस्त होता. वीरच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. वीरच्या मृत्यूनंतर गरबा आयोजकांना गरब्याचा कार्यक्रम रद्द केला. तरुण मुलाच्या मृत्यूने वीरचे वडील रिपल शाह आणि आई यांना जबर धक्का बसला आहे.
24 तासात 10 जणांचा मृत्यू
गुजरातमध्ये (Gujrat) नवरात्रोत्सवात गरबा खेळताना तरुण मुलांना हार्टअटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या चोवीस तासात विविध ठिकाणी 10 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये बहुतांश तरुणा मुलांचा समावेश आहे. नवात्रीच्या सहा दिवसात 108 या इमरजेंसी नंबरवर तब्बल 521 कॉल हे केवळ श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास होत असल्याचं आहेत. अहमदाबादमध्ये 24 वर्षांचा एक तरुण गरबा खेळताना अचानक जमिनीवर कोळसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. बडोदाच्या डभोईमध्ये 13 वर्षांच्या मुलाचा गरबा खेळताना हार्टअटॅकने मृत्यू झाला.
कपडवंजमध्ये एका 17 वर्षांच्या मुलाचाही गरबा खेळताना मृत्यू झाला. तर बडोद्यात 55 वर्षांचा व्यक्ती आपल्या सोसायटीत गरबा खेळत असताना हार्टअटॅकने कोसळला. राजकोटमधून दोन जणांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
गेल्या काही वर्षात गुजरातमध्ये नवरात्रोत्सव काळात हार्टअटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या काळात मंडपात डॉक्टर, अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. गुजरात सरकारनेही सरकारी रुग्णालयांना अलर्ट जारी केलं आहे. मंडपात अॅब्युलन्ससाठी कॉरिडोर बनवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हार्ट अटॅकची कारणं
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कमी पाणी पिणं, मिठाचा अतिप्रमाणा वापर, ब्लड प्रेशर, अपुरी झोप ही कारणं तरुण वर्गात हार्ट अटॅकची कारणं ठरत आहेत. गरबा खेळण्यासाठी मोकळ्या मैदानांचा वापर करावा असं आव्हान डॉक्टरांनी केलंय. तसंच मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्राथमिक उपचारांचं प्रशिक्षण, कार्यक्रमाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा असावा असं आवाहनही केलंय. हृद्याची समस्या किंव मधुमेह असलेल्या रुग्णांनी जस्त वेळ गरबा खेळू नये असा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय.