Dog Attack : भटक्या कुत्र्याने  (Stray Dog) एका लहानगीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. पण त्याही पेक्षा इथल्या महापौरांनी (Mayor) हल्ला करण्यामागे सांगितलेल्या कारणाचीच जास्त चर्चा होत आहे. सूरत शहरातील (Surat) अलथान परिसरात घराबाहेर खेळणाऱ्या एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला (Dog Attack) केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौरांचा अजब दावा
गुजरातमधल्या सूरत शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अलथानमध्ये लहान मुलीवर कुत्र्याने हल्ला करण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पसिरातील नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर सूरतच्या महापौर हेमाली बोघावाल यांनी याची दखल घेतली. पण यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचवल्या. महापौरांनी केलेल्या दाव्यानुसार कुत्र्यांना डायबिटीस (Diabetes) झाल्याने ते आक्रमक झाले आहेत. 


भटक्या कुत्र्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या असून पालिका यावर काम करत असल्याचं महापौर हेमाली बोघावाल यांनी म्हटलंय, तसंच भटके कुत्रे पकडण्यासाठी पालिकेने पथकं तयार केली आहेत. कुत्र्यांमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढल्याने ते आक्रमक झाल्याचंही त्या म्हणाल्या.


मुलीचा आरडाओरडा
अलथान परिसरात एक लहान मुलगी घराबाहेर खेळत होती. याचवेळी कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. मुलीचा आरडा-ओरडा ऐकून आसपासची लोकं धावत आली आणि त्या कुत्र्याला पळवून लावलं. मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करणअयात आलं. 


हैदराबादमधली धक्कादायक घटना
फेब्रुवारी महिन्यात कुत्र्याने एका चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. तीन भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या लहान मुलावर हल्ला केला. कुत्र्यांनी मुलाचे अक्षरश: लचके तोडले. त्याला रस्त्यावरुन फरफटत नेलं. मुलाच्या जोरजोरात रडण्याच्या आवाजाने त्याचे वडील धावत आले आणि मुलाला कुत्र्यांपासून दूर केलं. हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला गेला. 


देशभरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रसह, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. पायी चालणारे, सायकल किंवा दुचाकी चालवणाऱ्यांना कुत्रे लक्ष बनवतात.