Gyanvapi : मशीद कोणीही घेऊ शकत नाही कुर्बानी देण्यासाठी तयार, मुस्लीम खासदाराचे वक्तव्य
न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच सपा खासदाराने चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Gyanvapi Row : समाजवादी पक्षाचे (SP) खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांनी रविवारी दावा केला की वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत 'शिवलिंग' नाही. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मशीद कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही
समाजवादी पक्षाच्या खासदाराचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. शफीकुर्रहमान बर्क यांनी या पुढे म्हटले आहे की, आमच्याकडून मशीद कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कितीही त्याग करावा लागेल, आम्ही देऊ, मरेपर्यंत ज्ञानवापी सोडणार नाही. मुस्लिमांकडून कोणीही ज्ञानवापी घेऊ शकत नाही.'
अयोध्येत राम मंदिर बांधले जात असले तरी तिथे मशीद आहे, असेही ते म्हणाले. संभलचे सपा खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी पक्ष कार्यालयाबाहेर ज्ञानवापी मशिदीशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात पत्रकारांना सांगितले की, "2024 च्या निवडणुका लक्षात घेऊन ही परिस्थिती निर्माण केली जात आहे. इतिहासात खोलवर गेल्यास ज्ञानवापी मशिदीत 'शिवलिंग' नव्हते हे कळते. हे सर्व चुकीचे आहे.'
सत्तेच्या जोरावर राम मंदिर उभारले जात आहे
सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेण्यासाठी शफीकुर्रहमान बर्क लखनौला पोहोचले होते. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीबाबत ते म्हणाले, 'मी अजूनही म्हणतो की तिथे मशीद आहे. सत्तेच्या जोरावर राम मंदिर उभारले जात आहे. सपा खासदाराने आरोप केला की, 'आम्हाला (मुस्लिम) टार्गेट केले जात आहे. मशिदींवर हल्ले होत आहेत. सरकार असे चालत नाही. सरकारने कायद्याचे प्रामाणिकपणे पालन करावे. मात्र, राज्यात कायद्याचे राज्य नाही, बुलडोझरचे राज आहे.
भाजपचे प्रत्युत्तर
शफीकुर्रहमान बर्क यांच्या वक्तव्यावर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. शहजाद पूनावाला म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच सपा नेते लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. अखिलेश यांनी आक्षेपार्ह विधाने करून हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या होत्या आणि त्यांच्या पक्षाचे खासदार प्रक्षोभक विधाने करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच सपाकडून चिथावणी देण्याचे राजकारण केले जात आहे.