सहा वर्षांनंतर `त्याची` पाकिस्तानातून सुटका; आई म्हणालेली, `मेरी मॅडम महान`
पाहा तो काय म्हणाला....
मुंबई : भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाचं वृत्त कळताच या बातमीवर प्रथमत: आपला विश्वासच बसला नव्हता अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेल्या मुळच्या भारतीय असणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर हामिद निहाल अन्सारी याने दिली आहे.
सहा वर्षांपूर्वी हामिद पाकिस्तानात एका तरुणीला (प्रेयसीला) भेटण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आल्यानंतर तो त्या तरुणीच्या प्रेमात पडला होता.ज्यानंतर २०१२ मध्ये जेव्हा तो पाकिस्तानमध्ये गेला त्यावेळी त्याला शेजारी राष्ट्राकडून अटक करण्य़ात आली होती. केंद्र सरकार, हामिदची आई आणि इतर काही व्यक्तींच्या अथक प्रयत्नांनंतर हामिदला भारतात परत आणण्यात यश आलं होतं.
तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर तो मायदेशी परतला होता. ज्यानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्याची भेट घेतली होती. या भेटीला व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. स्वत:च्या मुलाचं स्वागत करावं तितक्यात आपलेपणाने स्वराज यांनी हामिदचं स्वागत करत त्याला दिलासा दिला होता.
देशाच्या महत्त्वपूर्ण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणाऱ्या एका व्यक्तीकडून आपल्याला मिळालेली वागणूक पाहून हामिदही भावूक झाला होता. आजच्या घडीला सुषमा स्वराज आपल्यात नसल्याच्या वास्तवाने त्याच्या भावना अनावर झाल्या.
'त्यांच्याप्रती माझ्या मनात प्रचंड आदर आहे. माझ्या मनात कायमच त्यांचं अस्तित्व असेल. त्या मला आईप्रमाणेच होत्या', असं हामिद म्हणाल्याचं वृत्त एएनआयने प्रसिद्ध केलं. पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर आयुष्याच्या या वाटेवर पुढच्या दिशेने पाहण्याच्या आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टी दिल्याचंही त्याने सांगितलं. देशासोबतच आपणही एक मोठी गोष्ट गमावल्याची भावना त्याने व्यक्त केली.