हार्दिक पटेलची प्रकृती खालावली; रुग्णालयात हलवले
हार्दिक पटेलने २५ ऑगस्टला उपोषणला सुरुवात केली होती.
अहमदाबाद: पाटीदार आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीसाठी गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलची प्रकृती शुक्रवारी प्रचंड खालावली. त्यामुळे हार्दिकला रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हार्दिक पटेलने २५ ऑगस्टला उपोषणला सुरुवात केली होती. प्रकृती खालावत गेल्याने उपोषणाच्या नवव्या दिवशी हार्दिकने स्वत:चे मृत्यूपत्रही तयार केले होते. या मृत्यूपत्रात हार्दिकने आई-वडिल, एक बहिण, २०१५ साली कोटा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या १४ युवकांचं कुटुंब, आपल्या गावातील आजारी गायींचा आश्रय असलेले ठिकाण यांच्यामध्ये संपत्ती वाटली होती.
हार्दिकला सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हार्दिकच्या प्रकृतीबाबत अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने हार्दिक समर्थक जमा झाले आहेत. स्थिती नियंत्रणात राखण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.