परंपरेला छेद; गुटखा किंग लालवानींच्या पार्थिवाला मुलींनी दिला मुखाग्नी
नोएडा : वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला गुटखा किंग हरिभाई लालवानींच्या मुलींनी छेद दिला. लालवानी यांना एकूण चार मुली आहेत. या मुलींनी लालवानी यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. तसेच, स्मशानभूमीत गेल्यावर मुखाग्नीही दिला.
गुटखा किंग नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेले तसेच, पान सेलर्स वेल्फेयर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभाई लालवानी (वय -65) यांचे पार्थिव शनिवारी पंचतत्वात विलीन झाले. या वेळी लालवानी यांच्या चार मुलींनी त्यांच्या पार्थीवाला स्मशानभुमीत जाताना खांदा दिला. हरिभाई लालवानी यांची अंत्ययात्रा नोएडा येथील सेक्टर-40 शनिवारी सकाळी निघाली होती. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रिन्स गुटखाचे मालक असलेले लालवानी 1990च्या दशकात नोएडातील आंत्रप्रन्योअर असोसिएशनचे अध्यक्ष बनले होते. अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच लालवानींनी 1994मध्ये नोएडा झालेल्या येथे झालेल्या बहुचर्चीत घर वाटप घोटाळ्याचा मुद्दा लाऊन धरला. ज्यात नोएडा प्राधिकरणातील तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नीरा यादव यांच्यासह आयएएस अधिकारी राकेश कुमार यांना सीबीआय न्यायालयाने सजा ठोठावली होती.
दिल्लीत एका पान दुकानातून आपला व्यवसाय सुरू करणारे हरिभाई लालवानींनी गुटखा व्यवसायात नाव कमावले. 1990 पासून ते गुटखा किंग नावाने ओळखले जाऊ लागले.