Cyber Crime: हरियाणामध्ये (Haryana) देशाला हादरवून टाकणारा एक घोटाळा (Scam) समोर आला आहे. येथील नूंह येथे पोलिसांनी सायबर क्राइममध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड केलं आहे. 'जामतारा' (Jamtara) घोटाळ्यापेक्षाही हा मोटो घोटाळा असून याची व्याप्ती डोकं चक्रावून टाकणारी आहे. हे आरोपी बनावट सीम, आधार कार्डच्या माध्यमातून देशभरातील लोकांना आपल्या जाळ्यात ओढत होते. अंदमान-निकोबार इथपर्यंत ते पोहोचले होते. इतकंच नाही तर त्यांनी बँकेत बनावट खाती उघडून ठेवली होती. पोलिसांना आपला थांगपत्ता लागू नये यासाठी या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले जात होते. आरोपींच्या चौकशीत फसवणुकीची तब्बल 28 हजार प्रकरणं समोर आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27-28 एप्रिलच्या रात्री 5000 पोलिसांच्या 102 पथकांनी जिल्ह्यातील 14 गावांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. यावेळी तब्बल 125 संशियत हॅकर्सना ताब्यात घेण्यात आलं. यामधील 66 जणांची ओळख पटवत त्यांना अटक करण्यात आली आहे. सर्वांना 11 दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे. 


पोलिसांनी चौकशी केली असताना आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कशाप्रकारे बनावट सीम कार्ड आणि आधार कार्डच्या सहाय्याने आपण लोकांची फसवणूक करत होतो याची माहिती त्यांनी दिली आहे. पोलिसांना छापा टाकला असताना मोबाइल आणि सीम कार्ड जप्त केले आहेत. यामधून अजून काही माहिती मिळते का याची पोलीस पाहणी करत आहेत. तसंच संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचीही मदत घेतली जात आहे. 



या सायहर गुन्हेगारांनी देशभरातील 35 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 28 हजार लोकांची 100 कोटींची फसवणूक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या सायबर गुन्हेगारांविरोधात आधीच 1364 गुन्हे दाखल आहेत. हरियाण पोलिसांनी इतर राज्यांनाही या अटकेची माहिती दिली आहे. 


तपासादरम्यान पोलिसांना 219 खाती आि 140 युपीआय खात्यांची माहिती मिळाली आहे, ज्यांचा वापर सायबर गुन्हेगारीसाठी केला जात होता. ही खाती ऑनलाइन वापरली जात होती. लोकांना नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणुक करत नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाइल नंबर आणि केवायसीच्या माध्यमातून गंडा घातला जात होता. 


याशिवाय हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, पंजाब, नॉर्थ ईस्ट, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सक्रीय असणाऱ्या 347 सीम कार्डचीही माहिती मिळाली आहे. यांचा वापर सायबर गुन्हेगारीसाठी केला जात होता. तपासादरम्यान बनावट सीम कार्ड आणि बँक खात्यांचं मुख्य स्त्रोत राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्याशी जोडला गेल्याचं समोर आलं आहे. 


हे आरोपी फेसबुक बाजार, ओएलएक्स आणि इतर साइटवर दुचाकी, कार, मोबाइल फोन अशा गोष्टींवर आकर्षक ऑफर देत लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचे. तसंच वर्क फ्रॉम होमच्या जाहिराती देतही लोकांची फसवणूक करत होते. याशिवाय नाणी विकणं, खरेदी करणं, सेक्स्टॉर्शन, केवायसी आणि कार्ड ब्लॉक करण्याच्या बहाण्याने लोकांना चुना लावत होते. 


गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता पोलीस महानिरीक्षकांनी 102 पोलीस पथकं तयार केली होती. यावेळी पोलिसांनी एकाच वेळी 320 ठिकाणांवर छापे टाकले.  यामध्ये 166 बनावट आधार कार्ड, 5 पॅन कार्ड, 128 एटीएम कार्ड, 66 मोबाइल फोन, 99 सीम, 5 पीओएस मशीन आणि 3 लॅपटॉप जप्त केले आहेत.