नवी दिल्ली : हरियाणातील रेवडी येथील एका शाळेतील शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांना बुटाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांना बुटाने मारहाण करत असल्याचे फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचलं. दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी या घटनेची तक्रार शाळा प्रशासनाकडे केली आहे.


या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले की, शिक्षकाने आपली चूक मान्य केली आहे. विद्यार्थ्यांनी नियम तोडल्यामुळे शिक्षकाने त्यांना शिक्षा दिली. मात्र, ज्या पद्धतीने मारहाण केली आहे ती चुकीच्या पद्धतीने केली आहे आणि शिक्षकाने आपली चूक मान्य केली आहे. 


मात्र, अद्यापही शाळा प्रशासनाने आरोपी शिक्षकाविरोधात कुठलीच कारवाई केलेली नाहीये.



काही दिवासांपूर्वीच हरियाणातील गुरुग्राम येथील रेयॉन इंटरनॅशनल शाळेतील ७ वर्षांचा विद्यार्थी प्रद्युमन याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर हरियाणा सरकारने आश्वासन दिलं होतं की, राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात येईल.


बुधवारी सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी शाळेच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याच वर्षी १४ सप्टेंबर रोजी हरियाणातील दादरी येथील एका खासगी विद्यार्थ्याला शिक्षा देत अमानुष प्रकारे मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला होता. या प्रकरणी शाळा प्रशासनाने तीन शिक्षकांना निलंबित केलं होतं.