Hathras Case : कॉल डिटेल्समधून मोठी माहिती उघड
मार्च महिन्यापर्यंत ...
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस hathras येथे काही दिवसांपूर्वी झालेला बलात्कार आणि त्यानंतर पीडितेच्या मृत्यूमुळं साऱ्या देशातून संतापाची लाट उसळली आहे. एकिकडे पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय व्यक्तींपासून अनेकांनी पुढाकार घेतला असताना आता सदर प्रकरणातील महत्त्वाच्या माहितीचा खुलासा झाला आहे.
मुख्य आरोपी आणि पीडितेच्या भावाच्या CDR अर्थात कॉल डिटेल्स रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये मार्च महिन्यापर्यंत पीडितेच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती आणि मुख्य आरोपीच्या कुटुंबांमध्ये संवाद झाल्याचं उघडकीस येत आहे.
सीडीआरमधीलच माहितीचा हवाला देत 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पीडितेच्या भावाच्या नावे असणाऱ्या मोबाईल नंबरवरुन मुख्य आरोपीला जवळपास १०० वेळा फोन करण्यात आले होते. ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यानची ही माहिती आहे.
अद्यापही आरोपीशी पीडितेचा भाऊच संवाद साधत होता की आणखी कोणी हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार पीडितेच्या कुटुंबातील व्यक्तीकडून आरोपीशी संपर्क साधण्यात आला होता. काही संभाषणं १५ मिनिटांहून अधिक कालावधीसाठीही झाली होती. दरम्यान, सदर प्रकरणी देशातील एकंदर वातावरण पाहता स्थापन केलेली एसआयटी अर्थात स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तपासाचा तपशील आणि महत्त्वाचा अहवाल सोपवणार असल्याचं म्हटलं जात आहे. आठवड्याभराच्या कालावधीतच एसआयटीनं या प्रकरणीचा तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.