त्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...
सर्व शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया ही सगळ्यात जास्त कठीण आणि जटील समजली जाते. मात्र याच मेंदूच्या जटील शस्त्रक्रियेदरम्यान एक रुग्ण गिटार वाजवत असेल.
बंगळुरू : सर्व शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया ही सगळ्यात जास्त कठीण आणि जटील समजली जाते. मात्र याच मेंदूच्या जटील शस्त्रक्रियेदरम्यान एक रुग्ण गिटार वाजवत असेल. ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र ही घटना घडली आहे. बंगळुरुमधल्या भगवान महावीर जैन रुग्णालयात. ऑपरेशन टेबलवर मेंदूची शस्त्रक्रिया सुरु असताना रुग्ण चक्क गिटार वाजवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
अभिषेक प्रसाद नावाचा 37 वर्षीय तरुण म्युझिशियन डायस्टोनिया या दुर्धर न्युरोलॉजिकल डिसऑर्डरने त्रस्त होता. यामुळे त्याच्या डाव्या हाताची तीन बोटं बधीर झाली होती. वाद्य वाजवणा-या रुग्णाच्या स्नायूंची हालचाल अतिप्रमाणात झाल्याने म्युझिशियन डायस्टोनिया हा आजार होतो. मूळचा बिहारचा असलेल्या अभिषेकवर जवळपास सात तास अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेदरम्यान अभिषेक पूर्णत: शुद्धीवर होता. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया सुरु असतानाच तो चक्क गिटार वाजवत होता. गिटारच्या तारा छेडून नेमकी कुठे समस्या आहे ते डॉक्टरांना तो दाखवत होता. दीड वर्षांपूर्वी गिटार वाजवत असताना त्याच्या डाव्या हाताची तीन बोटे व्यवस्थित काम करत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. ऑपरेशननंतर अभिषेक आजारातून पूर्णपणे बरा झाला असून पुन्हा एकदा गिटार वाजण्यासाठी सज्ज झाला आहे.