दिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक गाड्या पाण्यात अडकल्यात
राजधानी दिल्ली आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. पावसामुळे सखल भागात प्रचंड पाणी साचले असून याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. तसेच सरकारी कार्यालयात पाणी घुसल्याने कर्मचाऱ्यांनी फाईल्स घेऊन बाहेर पडणे पसंत केले. दिल्ली सचिवालय ऑफिसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात गाड्या अडकून पडल्या होत्या.
अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नोएडा आणि गुरगाव भागातही रस्त्यांना तळयाचे स्वरूप आले आहे. पावसाचा विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाचा फटका अनेक वाहनांना बसला. टिळक पुलाच्या खाली, मोदी मिल फ्लायओव्हर आणि धौला विहीर फ्लायओव्हर तथा वेलकम मेट्रो स्टेशन येथे पाणी तुंबले होते. अनेक ठिकांनी पाणी साचल्याने वाहनांना याचा त्रास सहन करावा लागला.