हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर, सतर्कतेचा इशारा
हिमाचल प्रदेशात तुफान पावसानं कहर
शिमला : हिमाचल प्रदेशात तुफान पावसानं कहर केला आहे. जनजीवव पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याची देखील माहिती आहे. बियास नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुल्लूत पुरामध्ये दोघे वाहून गेले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणचे मार्ग आणि पूल मुसळधार पावासनं वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पाच राष्ट्रीय महामार्गांसह ३०० पेक्षा अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ मनाली आणि कुल्लूदरम्यान मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली आहे.
'गेल्या 2 दिवसात राज्यातील 22 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत पावसामुळे 43 जणांचा मृत्यू झाला आहे. 574 कोटींची संपत्तीचं नुकसान झालं आहे.' अशी माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली आहे.
हिमाचल प्रदेशच्या मंडी, कांगरा, हमीरपूर जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे. बियास नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते आहे. बियास नदीला आलेल्या पुरामुळे इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात कोट्यावधींचे नुकसान झालं आहे.