नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील बर्‍याच भागात मान्सूनचं आगमन झालं आहे. राजधानी दिल्लीत पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे वातावरण थंड झालं आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे बर्‍याच ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. दिल्लीतील मिंटो रोडवर मुसळधार पावसाने पाणी साचलं. डीटीसी बस जवळजवळ पूर्णपणे पाण्याखाली गेली होती.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय उत्तर प्रदेशातील बर्‍याच जिल्ह्यांत हलका रिमझिम आणि अधून मधून पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस हरियाणा, पंजाब आणि हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीचा विचार करता हवामान खात्याने या राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दक्षिण गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे दोन दिवस मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे.



दिल्ली, पंजाब आणि हरियाणा येथे रविवारपासून सतत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने शनिवारी केलेल्या अंदाजात व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मान्सून उत्तरेकडे जाईल आणि पुढील 3-4 दिवस स्थिर राहील. दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये 19 ते 21 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत हवामान खात्याने (आयएमडी) पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतात पाऊस सुरू राहिल्यामुळे लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे, परंतु मुसळधार पावसामुळे आसाम व इतर ईशान्येकडील राज्यांमधील पूरस्थिती आणखी बिकट होऊ शकेल. उत्तराखंड आणि डोंगराळ राज्यात भूस्खलन होऊ शकते.


भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) येत्या दोन दिवसांत दिल्लीत काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विभागाचे प्रादेशिक अंदाज केंद्र प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, मान्सूनची उत्तरेकडे वाटचाल सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसांत दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत 47.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जी सामान्य 109.4 मिमीपेक्षा 56 टक्के कमी आहे.


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही तासांत बुलंदशहर, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, शामली, मेरठ, हस्तिनापूर, बिजनोर, नजीबाबाद, मुरादाबाद, चांदपूर आणि उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागात तुरळक गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर हरियाणाच्या जींद, रोहतक, पानीपत, भिवानी आणि गुरुग्राममध्येही पावसाची शक्यता आहे.


मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. पिथौरागडच्या मुनस्यारीमध्ये मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. एकीकडे, डोंगर कोसळत असताना, पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. ढिल्लम, जळधुंगा, धापा, राठी, चौणा, बसंतकोट, सेरा, कैथी, सेवाला आदी गावात लोकांच्या घरांचे महत्त्वपूर्ण नुकसान झाले आहे. रुद्रप्रयागातील पर्वतातून दरड कोसळल्याने केदारनाथ आणि बद्रीनाथ महामार्ग बंद होते. चामोलीतही पावसाचा कहर सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे.


आसाममध्ये पूर आल्याने घरांचे नुकसान झाले असून पिके नष्ट झाली आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, धुबरी जिल्ह्यातील पुरामुळे 4 लाख लोकांचं नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे.