नवी दिल्ली : जम्मूमध्ये तावी नदीला पूर आला आणि अचानक पाणी वाढलं. या पाण्यात दोघे अडकून पडले होते. या दोघांच्या सुटकेसाठी लष्कराच्या हेलिकॉ़प्टरला बोलवावं लागलं. सुदैवानं तावी नदीवर एक बांध होता. या बांधापर्यंत पाणी पोहोचलं नव्हतं. त्यामुळे अडकलेल्या दोघांनी या बांधावर आसरा घेतला. लष्कराचं हेलिकॉप्टर आल्यावर हेलिकॉप्टरमधून शिडी पाण्यात सोडण्यात आली आणि शिडीच्या माध्यमातून दोघांची सुटका करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात पावसानं कहर केला आहे. हिमाचल प्रदेशात तुफान पाऊस झालाय. बहुतांश जिल्ह्यातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झालीय. बियास नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुल्लूमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरूय. अनेक ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.


हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणचे मार्ग आणि पूल मुसळधार पावासनं वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पाच राष्ट्रीय महामार्गांसह ३०० पेक्षा अधिक रस्ते बंद करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ मनाली आणि कुल्लूदरम्यान मोठ्या प्रमाणात खचलाय. त्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली आहे.


हिमाचल प्रदेशच्या मंडी, कांगरा, हमीरपूर जिल्ह्यात पावसानं कहर केलाय. बियास नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतेय. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.  अतिवृष्टीमुळे राज्यात कोट्यावधींचे नुकसान झालं आहे.


उत्तराखंडच्या टिहरीमधल्या प्रतापनगरमध्ये जलकुर नदीच्या प्रवाहात एक पूल वाहून गेलाय. जोरदार पावसामुळे याठिकाणची वाहतूक बंद आहे. अनेक जण दोन्ही बाजूला अडकून पडलेत. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. 


पंजाबमधल्या रोपार, मियापूरमध्येही प्रचंड पाऊस झालाय... त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.


हरियाणामधल्या कर्नालमध्येही पावसामुळे हाहाकार उडालाय. हतनीकुंड धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्यानं पाणी साचलंय. लोकांचं पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे.