पावसाचा 5 राज्यांमध्ये कहर, मुंबईसह किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज
५ राज्यांमध्ये पूर आल्याने जनजीवन विस्कळीत
मुंबई : उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कहर माजला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. तर राजधानी दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस पडला असून जनजीवन सुरळीत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बुधवारी दिल्ली आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर मुंबईच्या किनारपट्टी भागात 15 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केरळमध्ये 52 ठार, 19 बेपत्ता
मंगळवारी केरळमधील इडुक्की जिल्ह्यात भूस्खलनामुळे मृतांचा आकडा 52 वर पोहोचला आहे, तर आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थितीमुळे लाखो लोकं प्रभावित झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इडुक्कीच्या ढिगाऱ्यातून 2 पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिस विभागाचे कर्मचारी बेपत्ता झालेल्या 19 जणांचा शोध घेत आहेत. हे लोकं 7 ऑगस्टपासून बेपत्ता आहेत.
दीडशे वर्ष जुने चर्च कोसळले
दरम्यान, मंगळवारी इडुक्की जिल्ह्यातील मुल्लापेरियार धरणातील पाण्याची पातळी 136.85 फूटपर्यंत पोहोचली. केरळमधील जवळपास दीडशे वर्ष जुने चर्च कोसळले आहे. त्याचबरोबर संपूर्ण भागात पाणी साचलं आहे. घरात पाणी शिरले आहे. केरळच्या कोट्यममधील पुरामुळे परिस्थिती अनियंत्रित झाली आहेय. बोट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. केरळ व्यतिरिक्त कर्नाटकात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 4 लोक बेपत्ता आहेत. या महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात जोरदार पाऊस पडत आहे.
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
आयएमडीचे केंद्र प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, बुधवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार मुंबईसह महाराष्ट्रात किनारपट्टी भागात १५ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये 75 लाख लोक प्रभावित
बिहारमधील पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बुलेटिननुसार पुराचे पाणी शिरल्याने १६ जिल्ह्यांमधील 62 हजार लोक अधिक प्रभावित झाले आहेत. तर 75 लाखाहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यात पुरामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहारच्या विधानसभेच्या आवारात पाणी
सलग पावसाने विधानसभा परिसरात पाणी साचलं आहे. बागमती धोक्याच्या चिन्हावरुन वाहते आहे. दरभंगाच्या शेकडो गावात पुराचे पाणी शिरले आहे. घर बुडाल्यामुळे लोकांनी उंच ठिकाणी आश्रय घेतला आहे.
आसाममध्ये 89 गावे बुडली
आसाममधील पुरामुळे लोकं त्रस्त आहेत. राज्यातील 3 जिल्ह्यांमधील सुमारे 14 हजार लोकं प्रभावित झाले आहेत. यावर्षी आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे तब्बल 136 जणांचा बळी गेला आहे, त्यापैकी 110 लोक पूर-संबंधित घटनांमध्ये मरण पावले असून 26 जणांचा भूस्खलनात मृत्यू झाला आहे.