नवी दिल्ली : मुसळधार पावसाने उत्तराखंडच्या सर्व भागात, विशेषत: कुमाऊं भागात कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालाय. फक्त गेल्या दोन दिवसात 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी 5 लोकांचा मृत्यू झाला होता तर मंगळवारी 11 लोकांचा मृत्यू झालाय. नैनीताल शहराचा संपर्क तुटला आहे, मुसळधार पावसामुळे अनेक घरे कोसळल्याने अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक ठिकाणी भूस्खलन


भूस्खलनामुळे नैनीतालकडे जाणाऱे तीन रस्ते पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामुळे या पर्यटन स्थळाचा राज्याच्या इतर भागांशी संपर्क तुटलाय. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये सांगितले की, ढगफुटी आणि भूस्खलनानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. धामी यांनी आश्वासन दिले की राज्यात सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराची तीन हेलिकॉप्टर लवकरच येतील. यापैकी दोन हेलिकॉप्टर नैनीतालला पाठवण्यात येतील, जिथे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



अनेक घरे कोसळली


ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली आहेत आणि लोक ढिगाऱ्यात अडकले आहेत. बचाव कार्यात मदत करण्यासाठी गढवाल प्रदेशात एक हेलिकॉप्टर पाठवले जाईल. दरम्यान, उधम सिंह नगरच्या बाजपूर भागात अतिवृष्टीमुळे एक व्यक्ती वाहून गेली, असे एसईओसीने सांगितले. अल्मोडा जिल्ह्यातील भात्रोजखान भागातील रापड गावात एका घराच्या ढिगाऱ्याखाली चार जण अडकले होते, त्यापैकी एका महिलेची सुटका करण्यात आली. एसईओसीने सांगितले की, जिल्ह्यातील भिकियासेन येथे इमारत कोसळल्याने एकाच कुटुंबातील सर्व सदस्य ढिगाऱ्यात अडकले आहेत पण त्यांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही. चमोली जिल्ह्यातील जोशीमठजवळ तीन महिलांसह चार मजूर अडकले. या घटनेत एक महिला मजूर जखमी झाली आहे तर उर्वरित सुखरूप आहेत.



चारधाम यात्रींना आवाहन


मुख्यमंत्र्यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री धनसिंह रावत आणि राज्याचे डीजीपी अशोक कुमार यांच्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बाधित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण केले. त्यांनी सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे आकलन करून त्यांना लवकरात लवकर अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले. लोकांना घाबरू नका असे आवाहन करताना ते म्हणाले की त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. त्यांनी चारधाम यात्रेकरूंना आवाहन केले की ते जिथे आहेत तिथेच राहा आणि हवामान सुधारण्यापूर्वी प्रवास सुरू करू नका. त्यांनी चामोली आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना चारधाम यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिलेत.