शिमला : हिमाचल प्रदेशातील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. तसेच हिमाचल प्रदेशातील अनेक ठिकाणी पाऊसही पडला असल्याने हिमाचल प्रदेशातील थंडीचा जोर अधिकच वाढला आहे. हिमाचल प्रदेशमधील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कल्पा, केलाँग, डलहौजी आणि मनालीमध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवार सकाळी आठ वाजेपर्यंत मोठी बर्फवृष्टी झाली. परिसरात बर्फवृष्टी थांबली असली तरी पाऊस सुरूच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी शिमलासह राज्यातील अनेक भागात पाऊस झाला. शिमलामध्ये १८.७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मनाली, कुफरी या दोन्ही ठिकाणी तापमानाचा पारा १.४ अंशांवर पोहचला आहे. डलहौजीमध्ये ०.२ अंश सेल्सिअसहून कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.



लाहौल आणि स्पितीचे प्रशासकीय केंद्र असलेले केलाँग राज्यातील सर्वात थंड ठिकाण आहे. या भागात तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअस ते ९.८ अंश सेल्सिअच्या खालीच राहिले आहे. किन्नौर जिल्ह्यातील कल्पामध्ये २.८ अंश सेल्सिअसहून कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बर्फवृष्टीमुळे वाहतूकीवरही परिणाम झाला आहे.