जयपूर : 'गाय' राष्ट्रीय प्राणी घोषित करता करता देशात आणखी एक थोडा गंमतीशीर वाद उभा राहिलाय. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र चंद्र शर्मा यांच्या एका वक्तव्यामुळे हा वाद उभा राहिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियाशी बोलताना न्यायाधीश शर्मा यांनी भारतानं 'मोर' हा राष्ट्रीय पक्षी म्हणून का घोषित करण्यात आला, त्याचं कारण सांगितलंय. मोर हा सेक्स करत नाही, तो ब्रह्मचारी असतो, म्हणून तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे, असं शर्मा यांनी म्हटलंय. याच दिवशी न्यायाधीश शर्मा सेवानिवृत्त झालेत.


'आपण मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून का घोषित केला? यासाठी कारण मोर आजीवन ब्रह्मचारी राहतो. मोर रडताना त्याचे अश्रु येतात ते पिऊन लांडोर गर्भवती होते. मोर कधीही लांडोरीसोबत सेक्स करत नाही' असं शर्मा यांनी म्हटलंय. 


भगवान कृष्णांनीदेखील आपल्या मुकूटात मोरपंख यासाठीच लावलं कारण मोर ब्रह्मचारी असतो. साधुसंतदेखील यासाठी मोराचे पंख वापरतात, मंदिरांत मोरपंख लावले जातात. याचप्रमाणे गायीतही असे गुण असतात त्यामुळे तिला 'राष्ट्रीय प्राणी' घोषित केलं गेलं पाहिजे, असंही शर्मा यांचं म्हणणं आहे. 


गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावं आणि गोहत्या करणाऱ्यांना आजीवन तुरुंगाची शिक्षा ठोठावण्यात यायला हवी, असं वक्तव्य त्यांनी एक निर्णय सुनावणी दरम्यान केलंय. त्यांच्या याच वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.