पेट्रोल पुन्हा महागलं; मुंबईत ८० पार
मुंबईत पेट्रोलचा दर ८० रुपयांच्या वर
नवी दिल्ली : पेट्रोलचा दर जवळपास एका वर्षातील उच्च पातळीवर गेला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ८० रुपयांच्या वर पोहचला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलचा दर ७५ रुपये इतका आहे. तर डिझेल ६६.०४ रुपये लीटर दराने विकलं जात आहे.
सोमवारी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमतीत ५ पैशांची वाढ झाली आहे. तर दिल्ली, कोलकाता, मुंबईत डिझेलच्या दरात १० पैशांची आणि चेन्नईत ११ पैशांची वाढ झाली आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, पेट्रोलचा दर दिल्लीत ७५ रुपये, कोलकाता ७७.६७, मुबंई ८०.६५ आणि चैन्नईमध्ये ७७.९७ रुपये इतका आहे. तर या महानगरांमध्ये डिझेलच्या किंमती वाढून दिल्लीत ६६.०४, कोलकाता ६८.४५, मुंबई ६९.२७ आणि चैन्नईत ६९.८१ रुपये प्रति लीटरवर पोहचल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढत होत आहे. तेल कंपन्यांनी गेल्या दोन दिवसांत पेट्रोलच्या दरात १४ पैशांची तर डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ केली आहे.
ऑइल मार्केटिंग कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करतात. कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या दरात पेट्रोलच्या किंमतीसह एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन जोडल्यानंतर याची किंमत जवळपास दुप्पट होते.
आपापल्या शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घरबसल्याही जाणून घेता येऊ शकतात. केवळ एका एसएमएसवर (SMS) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची माहिती मिळू शकते. सकाळी ६ वाजल्यानंतर ९२२४९ ९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत माहिती मिळू शकते.