सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांना घरावर भाजपचे झेंडे लावण्याचा आग्रह?
आगामी महिनाभरात देशातील पाच कोटी घरांवर भाजपचे झेंडे लावण्याचा पक्षाचा मानस आहे.
शिमला: हिमाचल प्रदेशात सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांनी आपापल्या घरांवर भाजपचे झेंडे लावावेत, अशी नवी टुम सरकारकडून काढण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे मिळून ८.५ लाख लाभार्थी हिमाचल प्रदेशात आहेत. या सर्वांनी 'मेरा परिवार, भाजपा परिवार' या अभियानातंर्गत आपापल्या घरावर भाजपचे झेंडे लावून पक्षाला पाठिंबा द्यावा, असा प्रयत्न भाजप नेत्यांकडून सुरु आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने प्रचारासाठी 'मेरा परिवार, भाजपा परिवार' हे अभियान सुरु केले आहे. महिनाभर चालणाऱ्या विशेष प्रचार मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी अहमदाबादमध्ये झाला. यानिमित्ताने आगामी महिनाभरात देशातील पाच कोटी घरांवर भाजपचे झेंडे लावण्याचा पक्षाचा मानस आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावावा. त्यासोबत आपला सेल्फी काढावा आणि तो सोशल मीडियावर शेअर करावा, अशी सूचना यावेळी अमित शहा यांनी देशातील कार्यकर्त्यांना केली.
गरिबांसाठी लवकरच सिलिंडर मिळणार हफ्त्यांवर
मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पवित्रा अधिक आक्रमक दिसत आहे. त्यामुळे सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांनी भाजपचे झेंडे घरावर लावावेत, असा आग्रह नेत्यांनी धरला आहे. याबाबत हिमाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सत्पाल सिंह यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हिमाचल प्रदेशात भाजप सरकारच्या योजनांचे जवळपास ८.५ लाख लाभार्थी आहेत. आगामी काही दिवसांमध्ये भाजपचे कार्यकर्ते या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना घरांवर झेंडे लावण्याची विनंती करतील, असे सत्पाल सिंह यांनी सांगितले.
जे इमानदार आहेत त्यांचा चौकीदारवर विश्वास आहे - पंतप्रधान मोदी