`शिष्य` पडला `गुरु`वर भारी, राजेंद्र राणांकडून धुमल यांचा पराभव!
भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा धक्का बसलाय. महत्त्वाचं म्हणजे, धुमल यांचे `राजकीय शिष्य` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र राणा यांनी त्यांचा पराभव केलाय.
शिमला : भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा धक्का बसलाय. महत्त्वाचं म्हणजे, धुमल यांचे 'राजकीय शिष्य' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र राणा यांनी त्यांचा पराभव केलाय.
उल्लेखनीय म्हणजे धुमल यांनी आत्तापर्यंत दोन वेळा हिमाचल प्रदेशाचं मुख्यमंत्री पद भुषवलंय. राजेंद्र राणा राजकारणाची एबीसीडी धुमल यांच्याकडूनच शिकले... धुमल यांचा 'उजवा हात' म्हणून राणा एकेकाळी काम पाहत होते. निवडणुकीचा सारी जबाबदारी धुमल राणांवरच टाकत होते.
पण, या गुरु-शिष्याच्या जोडीत वादाची ठिणगी पडली ती एका घटनेनंतर.... धुमल सरकारच्या काळात एका खाजगी हॉटेलमध्ये पैशांची देवाण-घेवाण झाल्याचं समोर आल्यानंतर धुमल आणि त्यांच्या कुटुंबियांवर अनेक प्रश्न विचारले गेले. यानंतर राणा आणि धुमल यांच्या नातेसंबंधांत तणाव निर्माण झाला... आणि राणा यांनी धुमल यांच्याशी असलेलं नातं तोडलं.
२०१२ साली वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा राजेंद्र राणा यांनी त्यांना बाहेरून पाठिंबा दिला. याच वर्षी त्यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत मोठ्या मतांनी विजय मिळवला होता. त्यांना २४,६७४ मतं मिळाली होती.
दुसरीकडे, ७३ वर्षीय प्रेम कुमार धुमल यांनी १९९८ ते मार्च २००३ पर्यंत (भाजप-हिमाचल विकास काँग्रेस युती) आणि डिसेंबर २००७ ते डिसेंबर २०१२ पर्यंत दोन वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषवलंय.