Hindi Language : गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी भाषेला तीव्र विरोध होताना दिसत आहे. अशातच द्रमुकचे खासदार दयानिधी मारन (DMK MP Dayanidhi Maran) यांनी हिंदी भाषिकांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. दयानिधी मारन यांनी उत्तर प्रदेश - बिहारच्या लोकांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हिंदी भाषिक लोक शौचालये स्वच्छ करण्यासाठी तामिळनाडूमध्ये येतात, असं विधान दयानिधी मारन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने (BJP) जोरदार टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तामिळनाडूमध्ये येणारे हिंदी भाषिक लोक रस्ते आणि स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी येतात, असे दयानिधी मारन यांनी म्हटलं आहे. द्रमुक खासदारांच्या या वादग्रस्त वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये मारन हे इंग्रजी आणि हिंदी शिकणाऱ्या लोकांची तुलना करताना ऐकू येतात. "फक्त हिंदी शिकणारे बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोक बांधकामासाठी तामिळनाडूत येतात. ते रस्ते, स्वच्छतागृहे साफ करणे अशी छोटी-मोठी कामे करतात. त्यांना इंग्रजी कसे बोलावे ते कळत नाही. जे इंग्रजी शिकतात त्यांना आयटी कंपन्यांमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळतात," असे दयानिधी मारन यांनी म्हटलं आहे.


दयानिधी मारन यांच्या या वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. दयानिधी मारन यांच्या या वक्तव्याची क्लिप शेअर करताना भाजपने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना याबाबत विचारले आहे. द्रमुक खासदार सेंथिल कुमार यांनी संसदेत उत्तर भारतीयांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. यानंतर रेवंत रेड्डी म्हणाले होते की, तेलंगणाचा डीएनए बिहारच्या डीएनएपेक्षा चांगला आहे. आता द्रमुकचे नेते दयानिधी मारन यांनी त्यांच्या वक्तव्याने उत्तर-दक्षिण वाद पुढे नेला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले.



तसेच बिहारचे भाजप खासदार गिरिराज सिंह यांनी मारन यांच्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. "खासदार दयानिधी मारन म्हणतात की यूपी/बिहारमधील हिंदी भाषिक लोक तामिळनाडूमध्ये येतात आणि रस्ते आणि स्वच्छतागृहे स्वच्छ करतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालू यादव हे हिंदी भाषिक लोकांबद्दल त्यांच्या आघाडीच्या भागीदाराच्या मताशी सहमत आहेत का? द्रमुक आणि भारत आघाडीला हिंदी भाषिक बिहारी बंधू-भगिनींबद्दल एवढा द्वेष का आहे, याचा खुलासा त्यांनी करावा," असे मारन यांनी म्हटलं आहे.