हिंदू आणि आरएसएसचे नेते टार्गेटवर, दिल्लीत सतर्कतेचा इशारा
दिल्लीत ६ पैकी ३ दहशतवादी अजूनही मोकाट
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवाद्यांमुळे दिल्लीत सुरक्षा आणि गुप्त तपास यंत्रणेने सावधानतेचा इशारा दिला आहे. ६ दहशतवादी दिल्लीत आल्याचं सांगण्यात आलं आहे. यापैकी तिघांना काल दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन दहशतवाद्यांचा ठावठिकाणा सापडण्यास अद्याप दिल्ली पोलिसांना यश आलेलं नाही. अब्दुल शमीम, तौफिक आणि जफर अली अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. तर आणखी ३ दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. पोलीस या अटक केलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. या दहशतवाद्यांना पोलीस आणि आर्मीच्या भरती कॅम्पवर हल्ला करण्यास सांगण्यात आलं होतं.
दिल्ली-एनसीआरसह देशातील हिंदू नेते आणि आरएसएसच्या लोकांना देखील मारण्याचा आदेश देण्यात आला होता. जेथे हिंदू नेत्यांचे पोस्टर लागले आहेत. त्या पोस्टरवरुन हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याचा विचार होता. हे दहशतवादी कोड भाषेत बोलत असल्यामुळे त्यांची ही भाषा समजून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी आयसिसच्या ३ दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं. हे दहशतवादी पश्चिम यूपीकडून मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. ते आयसिसकडून आदेश मिळण्याची वाट पाहत होते.
दिल्लीच्या वजीराबादमध्ये गुरुवारी सकाळी एनकाउंटरनंतर या ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांकडून पोलिसांनी हत्यारं देखील जप्त केली आहेत. चौकशीनंतर पोलीस विविध ठिकाणी धाडी टाकत कारवाई करत आहेत.