नवी दिल्ली - वाढत्या महागाईमुळे अनेक गृहोपयोगी वस्तूंचे भाव वाढले असताना आता सौंदर्य प्रसाधनप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. एफएमसीजी क्षेत्रातील देशातील दिग्गज कंपनी हिंदूस्थान युनिलिव्हरने आपल्या विविध उत्पादनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गोरं होण्यासाठी वापरा अशी जाहिरात केली जाणारी आणि अनेक मध्यमवर्गीय भारतीयांकडून ज्याचा रोज वापर केला जाते असे फेअर ऍण्ड लव्हली क्रीम, देशात सर्वाधिक विकला जाणारा लाईफबॉय साबण आणि लिप्टन टी या सगळ्याचे भाव वाढविण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक वाढ ही लाईफबॉय साबणाच्या दरांमध्ये करण्यात आली आहे. या साबणाच्या किमती २१.७ टक्क्यांनी वाढविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कंपनीच्या लक्स साबणाच्या किंमतींमध्येही ६.४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने फेअर ऍण्ड लव्हली क्रीमच्या किंमतीमध्ये ५.४ टक्क्यांनी वाढ केली. त्याचबरोबर विविध धुण्यासाठी लागणाऱ्या पावडरच्या दरांमध्येही ५.४ टक्के वाढ करण्यात आली. लिप्टन टीच्या किमतीमध्ये १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या आधी या क्षेत्रातील कंपनी डाबर इंडिया आणि आयटीसीने सुद्धा आपल्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. 


कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या मार्जिनमध्ये फरक पडला होता. त्याचबरोबर या क्षेत्रातील कंपन्यांना बाबा रामदेव यांच्या पतंजलीशीही तगडी टक्कर द्यावी लागत आहे. आता पतंजलीची स्पर्धा काहीशी कमी झाल्यावर या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.