नवी दिल्ली : कोरोनावर लस आली मात्र HIVसारख्या दुर्धर आजारावर प्रभावी औषध कधी येणार असा प्रश्न संपूर्ण जगासमोर होता.  मात्र काळजी करण्याचं कारण नाही, अमेरिकेत HIV लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. नेमकी कशी आहे ही लस जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HIV अर्थात एड्स हा एक असा आजार आहे ज्यावर अद्याप कोणतंही औषध सापडू शकलेलं नाही. जगभरातील संशोधक गेल्या अनेक वर्षांपासून त्यावर संशोधन करतायेत, त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसतंय. अमेरिकेत HIVलसीच्या मानवी चाचणीला सुरवात झाली. 



बायोटेक फर्म मॉडर्ना आणि इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सीन इनिशिएटिव्ह अर्थात IAVI यांनी संयुक्तरित्या HIVलसीची निर्मिती केली आहे. ही लस बनवताना RNA तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.


IAVI G002 या नावानं जवळपास 56 लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. ही लस मानवी शरीरात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार करते. या अँटीबॉडीज HIVच्या कोणत्याही व्हेरियंटविरोधात प्रभावीपणे काम करू शकतात असा संशोधकांचा दावा आहे. 


लिम्फोसाइट्स या शरीरात पांढ-या पेशींप्रमाणे काम करतात.संक्रमणापासून बचावासाठी तसच जखम बरी करण्यात त्या उपयुक्त ठरतात. HIV लसीमुळे लिम्फोसाईट्स अधिक प्रभावीपणे काम करतील असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.


HIV लसीचं संशोधन करून संशोधकांनी वैद्यकीय क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकलंय. आता ही लस कितपत प्रभावी आहे, हे क्लिनीकल ट्रायलच्या निकालाअंती स्पष्ट होईल. मात्र यामुळे एचआयव्ही रुग्णांसाठी नवा आशेचा किरण उगवला आहे.