नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिलेत. यामुळे गृह, वाहन कर्जदार तसंच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्ज उपलब्ध होणार आहेत. कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांवर त्यामुळे निर्बंध येतील. प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर सक्तीचा बडगा उगारला आहे. रेपो दर कमी करूनही त्या प्रमाणात कर्ज व्याजदर बँका कमी करत नव्हत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी  अनेकदा खंत व्यक्त केली होती. वाहन, लघू उद्योगांसाठीही रेपो दराशी संलग्न व्याजदर उत्पादने असावीत असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रेपो दर बदलाचा थेट लाभ कर्जदारांना होईल.


ऑक्टोबर महिन्यातच दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण असल्याने ऐन सणांच्या तोंडावर स्वस्त कर्जाची भेट कर्जदारांना मिळणार आहे.


रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने बॅंकांना सर्व लोन रेपो रेटशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. १ ऑक्टोबरपासून सर्व बॅंकांनी गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, ऑटो लोन आणि एमएसएमई सेक्टरचे सर्व लोन जोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच व्याजदरात ३ महीन्यातून एकदा बदल करण्यास सांगितले आहे.


अनेक बॅंकांनी याआधीच आपले लोन रेपो रेटशी जोडले आहेत. आरबीआयच्या या निर्देशामुळे सर्वसामान्य व्यक्तींना फायदा होणार आहे. बॅंकांमध्ये हा नियम लागू झाल्यानंतर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जावरील ईएमआय कमी होणार आहे.