नवी दिल्ली : कुख्यात दाऊद इब्राहिम याची पत्नी महजबी शेख मुंबईत येऊ आपल्या वडिलांना भेटून गेली पण मोदी सरकारला याची खबरच लागली नाही. कारण, सरकार झोपले होते, असा आरोप कॉंग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे. 


एका व्हिडिओच्या माध्यमातून सुरेजावाला यांनी म्हटले आहे की, महजबी शेख आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेल्या वर्षी (२०१६) मुंबईत आली होती. पण, सरकारला याचा पत्ताच लागला नाही. सुरजेवाला यांनी सरकारी तपास यंत्रणांवरही निशाणा साधत 'सीबीआय' आणि 'रॉ' या संस्था त्या वेळी काय करत होत्या, असा सवालही विचारला आहे. दरम्यान, सुरजेवाला यांनी यांनी इकबाल कासकर याच्या विधानानंतर हा आरोप केला आहे.
इकबाल कासकर हा दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे. एका बिल्डरला खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कासकर याने आपली वहिणी महजबी शेख ही २०१६ मध्ये वडील सलीम कश्मीर याला भेटण्यासाठी आली होती. ती गुपचूपपणे भारतात आली आणि परतही गेली, अशी माहितीही कासकर याने पोलिसांना दिली आहे.
कासकर यांच्या विधानाचा आधार घेत सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, दहशदवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगाराची पत्नी आपल्या वडीलांना भेटायला भारतात येते आणि परत जाते. पण, तिला अटक होऊ शकत नाही? तिच्या विरूद्ध कारवाई का नाही केली गेली? असा सवाल विचारत सरकारने या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.