जगानं आपल्याला कसं स्मरणात ठेवावं? खुद्द रतन टाटांनीच सांगितलेली मनातली इच्छा...
प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. सामान्यांना आपलेसे वाटणारे रतन टाटा त्यांच्या निधनानंतर कसे स्मरणात राहावेत याबाबत स्वतः रतन टाटा यांनी सांगून ठेवलंय.
टाटा समूहाचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. टाटा हे त्यांच्या नम्रता आणि परोपकारासाठी ओळखले जाणारे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होतं. रतन टाटा यांच्या निधनाने सामान्य व्यक्तीनेही हळहळ व्यक्त केली आहे.
टाटा यांना या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये वयामानानुसार उद्भवणाऱ्या आजारांसाठी दाखल करण्यात आले होते आणि नंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं एक ट्विट देखील रतन टाटा यांच्याकडून करण्यात आलं होतं.
टाटा समूहाचे अध्यक्षपद
टाटा यांनी 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले, त्यांच्या आजोबांनी सुमारे एक शतकापूर्वी स्थापन केलेल्या विशाल समूहाची देखरेख केली.
रतन टाटा यांनी स्वतः सांगितले
एका मुलाखती दरम्यान रतन टाटा यांनी स्वतः सांगितले की, त्यांच्या पश्चात लोकांनी त्यांना कसे स्मरणात ठेवावे. तर रतन टाटा म्हणाले की, व्यवसायाच्या सर्वोत्तम हितासाठी काम करणारी व्यक्ती म्हणून लोकांनी त्यांची आठवण ठेवावी.
"मला अशी व्यक्ती म्हणून स्मरणात ठेवायला आवडेल ज्याने कधीही इतरांना दुखावले नाही आणि व्यवसायाच्या सर्वोत्तम हितासाठी काम केले," असे रतन टाटा यांनी 2014 मध्ये कोलकाता येथे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या लेडीज स्टडी ग्रुपने आयोजित केलेल्या संवादात म्हटले होते.
रतन टाटा यांनी CNBC 2018च्या मुलाखतीतही तेच सांगितले की, मला एक व्यक्ती म्हणून लक्षात ठेवलेलं मला आवडेल ज्याने काही बदल केले. त्यापेक्षा जास्त नाही आणि कमी देखील.
"... बदल घडवून आणण्यास सक्षम असलेली व्यक्ती म्हणून, गोष्टींकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काही बदल घडवून आणण्यासाठी जबाबदार असा," असे उत्तर रतन टाटा यांनी मे 2021 मध्ये दुसऱ्या मुलाखतीत सांगितले. रतन टाटा यांनी कधीही याबाबत प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर हे ठरलेलं होतं.
विनम्र रतन टाटा
28 डिसेंबर 1937 रोजी टाटा कुटुंबात जन्मलेल्या रतन एन टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठात आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. रतन टाटा कायमच त्यांच्या विनम्रतेसाठी ओळखले जातात. रतन टाटा यांचे व्यावसायिक कौशल्य, दूरदर्शी नेतृत्व हे प्रत्येकाने शिकण्यासारखे आहेत.