नवी दिल्ली : बऱ्याचदा आपल्याकडे नोटा नीट राहात नाहीत. कधी आपल्याकडून फाटतात, तर कधी समोरच्याकडून आपल्याला फाटलेली नोट मिळते. फाटकी नोट आली म्हणजे डोक्याला ताप होतो. कारण फाटकी नोट कोणीही सहसा घेत नाही. मग तुमच्याजवळ जर अशी नोट असेल तर त्याचं करायचं काय? तर ही नोट तुम्ही बदलून घेऊ शकता आणि तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू देखील शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाटलेल्या नोटेसंदर्भात RBI चा हा नियम जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन येणार नाही. अगदी तुम्हाला सेलोटेप चिकटवलेली नोट जरी मिळाली तरी ती तुम्ही बदलून घेऊ शकता.


काय सांगतो RBI चा नियम


RBI ने 2017 च्या एक्सचेंज करेन्सी नोट नियमानुसार ATM मधून फाटलेली नोट मिळाली तर तुम्ही अगदी सहज ती बदलू शकता. कोणतीही सरकारी बँक ती बदलून देण्यासाठी विरोध करू शकत नाही. अशा नोटा बँकांना बदलून देणं बंधनकारक आहे. 


कशी बदलायची नोट


तुमची नोट तुकड्यांमध्ये फाटलेली असेल तर बँक बदलून देऊ शकते. एखाद्या नोटेचा भाग गायब असेल तर ती नोट तुम्ही सरकारी बँकेतून बदलून घेऊ शकता. जर नोट पूर्ण फाटलेली किंवा जळलेली असेल तर RBI च्या शाखेत जाऊन ती बदलावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागणार आहे. 


पूर्ण पैसे मिळणार


तुम्हाला पूर्ण पैसे मिळणार की नाही हे ती नोट कशी फाटली यावर अवलंबून आहे. काही फाटलेल्या नोटांचे पैसे पूर्ण मिळतात. उदा. द्यायचं तर 50 रुपयांपेक्षा कमी किमतीची नोट फाटली तर त्या फाटलेल्या नोटेचं मूल्यमापन होईल आणि त्यानुसार तुम्हाला किती पैसे द्यायचे हे ठरवण्यात येईल. 


जर 50 रुपयांपेक्षा जास्त किमतीची नोट जास्त फाटली असेल तर तुम्हाला अर्धी रक्कम मिळणार आहे. जर एकाच नोटेचे दोन तुकडे झाले असतील आणि ती 50 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 40 टक्के रक्कम परत मिळणार आहे.


तक्रार कशी करावी


कोणत्याही बँकेने तुम्हाला फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिला तर तुम्ही त्याची तक्रार RBI ला करू शकता. त्यासाठी तुम्हाला crcf.sbi.co.in/ccf/  या वेबसाईटवर तक्रार नोंदवायची आहे. ही लिंक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे. 


कोणतीही बँक एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकाच्या तक्रारीच्या आधारे बँकेला 10 हजारांपर्यंतचा दंडही आकारला जाऊ शकतो.