भेसळयुक्त तुपाचा हृदयाला धोका; कसं ओळखाल शुद्ध आणि भेसळयुक्त तूप?
तूप आवडत नाही, असं म्हणणारे क्वचितच असावेत
मुंबई : कोणत्याही पदार्थाची चव आणखी वाढवणारा एक घटक म्हणजे तूप. स्निग्ध पदार्थांमध्ये तुपाचा समावेश होतो. या तुपाचे फायदेही मोजावे तितके कमीच. शरीरासाठी उपयुक्त असे अनेक घटक या तुपामध्ये आढळतात. तूप आवडत नाही, असं म्हणणारे क्वचितच असावेत. (Desi ghee)
तुम्हाला माहितीये का, हेच तूप जेव्हा भेसळयुक्त रुपात तुमच्या समोर येतं तेव्हा मात्र त्याचे परिणाम थेट तुमच्या हृदयावर होताना दिसतात.
परिणामी तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त याची ओळख आधी करुन घेणं कधीही महत्त्वाचं असतं. चला तर मग जाणून घेऊया हे नेमकं ओळखावं कसं...
गरम भांड्याची घ्या मदत
शुद्धता तपासण्यासाठी 1 चमचा तूप गरम भांड्यात टाका. ते वितळून लगेचच गडद रंगाचं होऊ लागल्यास ते शुद्ध आहे. वितळतानाच तूप पिवळं दिसल्यास मात्र ते भेसळयुक्त असेल.
पाहूनच ओळखा भेसळ
तुपाची शुद्धता रंग आणि सुवासानेही ओळखता येऊ शकते. तूप हलक्या पिवळ्या रंगाचं असतं. त्याचा पांढरा भाग हा तळाशी असतो. पण, काहीजण यामध्ये स्वस्तातील तेलही मिसळताना दिसतात.
शुगर बॉटल टेस्ट
एक चमचा तूप वितळवून पारदर्शक बाटलीमध्ये ठेवा यामध्ये थोडी साखर मिसळून बाटलीचं झाकण बंद करा. बाटली हलवून पाहा. पुन्हा ती एका ठिकाणी ठेवा. जर बाटलीच्या तळाशी तुम्हाला लाल रंग दिसला तर हे तूप भेसळयुक्त आहे.
हातावरही ओळखा शुद्धता
तूप तुमच्या हातावर ठेवा काही क्षणांत जर ते वितळण्यास सुरुवात झाली तर ते शुद्ध आहे असं समजा. पण, त्यामध्ये फारसा फरक दिसला नाही, तर मात्र त्यात भेसळ आहे, हे लक्षात घ्या.