पत्नीने जेवायला दिलं नाही, रागात त्याने तिचा जीवच घेतला; नंतर नराधम पतीने केले राक्षसी कृत्य...
Crime News In Marathi: पत्नीने जेवायला न दिल्याच्या रागातून एका नराधमाने तिची निर्घृणपणे हत्या केली आहे.
Crime News In Marathi: कर्नाटकमधील तुमकूर येथे पतीने पत्नीसोबत एक घृणास्पद कृत्य केले आहे. पत्नीने जेवण न दिल्याच्या रागातून माथेफिरु पतीने तिची अमानुषपणे हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी माहिती दिली आहे. आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर अमानुषपणे तिच्या शीर धडापासून वेगळे केले. इतकंच नव्हे तर, मृतदेहाची छिन्न-विछिन्न अवस्था केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घरातील अवस्था भयंकर अस्वस्थ करणारी होती. महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात छिन्न-विछिन्न अवस्थेत पडलेला होता. मृतदेहाच्या जवळच तिचे शिर पडलेले होते. ही घटना सोमवारी रात्री कुनिगल तालुक्याच्या हुलियुरुदुर्गा शहरात घडली आहे. आरोपीचे नाव शिवराम असं आहे. तर तो एका मशीन कारखान्यात कामाला आहे. शिवरामची पत्नी पुष्पलता हिच्यासोबत त्याचे दररोज भांडण होत होते. सोमवारी रात्रीदेखील त्यांच्यात वाद झाले होते.
सोमवारी जेव्हा दोघांत भांडण झाले तेव्हा पुष्पलताने आरोपीला रात्री जेवण दिले नाही. त्यामुळं दोघांतील भांडण अधिक वाढले. आरोपी शिवरामच्या नोकरीवरुन दोघांमध्ये अधिक वाद झाले. या वादामुळं शिवराम इतका संतापला होता की त्याने चाकुने तिच्यावर हल्ला केला आणि शरीराच्या काही भागावरही चाकुने हल्ला केला. मंगळवारच्या सकाळपर्यंत तो तिच्या शरीरावर हल्ला करत होता. त्यानंतर त्याने स्वतःच त्याच्या घर मालकाला त्याच्या गुन्ह्याबद्दल माहिती दिली.
धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्यांचा आठ वर्षांचा मुलगा झोपलेला होता. तुमकुरचे एसपी अशोक वेंकट यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी 35 वर्षांच्या एका महिलेचा मृतदेह आढळला होता. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तिचा पतीदेखील घटनास्थळी उपस्थित होता. त्याची चौकशी केल्यानंतर त्यानेच पत्नीची हत्या केल्याचे कबुल केले आहे.
10 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आरोपीला अटक केली आहे. शिवराम आणि पुष्पा यांनी 10 वर्षांपूर्वी इंटरकास्ट मॅरेज केले होते. त्यांच्यात लहान सहान वाद होत होते. सोमवारी त्यांच्यात नोकरीवरुन वाद झाले होते. त्यातच त्याने त्यांच्या पत्नीची हत्या केली होती आणि घर मालकाला फोन करुन याची माहिती दिली. घर मालकाने लगेचच आम्हाला फोन करुन याची माहिती दिली. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.