मुंबई : सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहत असताना राजकारणात रस नसलेल्यांनाही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा कायमच हेवा वाटतो. मुळात राजकारणात राहून समादकारण करत कायम देशहिताचाच विचार करणाऱ्या सुषमा स्वराज या खऱ्या अर्थाने लाखात एक होत्या. म्हणूनच तर, त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कलाकार म्हणू नका किंवा मग खेळाडू, प्रत्येकानेच त्यांना आपल्या परिने श्रद्धांजली वाहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास ४१ वर्षांहून अधिक काळ, राजकारणात सक्रिय असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदापर्यंत बऱ्याच जबाबदाऱ्या आपल्या मजबूत खांद्यांवर पेलल्या. यामध्ये त्यांनी कुटुंबालाही कायम प्राधान्य दिलं. त्यांना या साऱ्या प्रवासात साथ मिळाली ती म्हणजे पती स्वराज कौशल यांची. 


प्रसिद्धीझोतापासून दूर असणारे त्यांचे पती हे कायमच त्यांच्या आधारस्थानी होते. २०१८ मध्ये जेव्हा सुषमा स्वराज यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली तेव्हा पती कौशल स्वराज यांनी काही मिश्किल ट्विट लिहित सुषमा यांचे आभार मानले आणि त्यांच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छाही दिल्या. 


सोशल मीडियावर त्यांनी लिहिलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे, जी पाहता सुषमा स्वराज यांच्या खासगी आयुष्याची सुरेख बाजूही पाहायला मिळत आहे. 'मॅडम... निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मला आठवतंय की मिल्खा सिंग यांनीही एका वळणावर धावणं थांबवलं होतं' असं त्यांनी ट्विट करत लिहिलेलं. 


१९७७ पासून सुरु असणारी ही शर्यत जवळपास ४१ वर्षे चालली. तुम्ही ११ निवडणुकांमध्ये सहभागी झालात किंबहुना १९७७ पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत (१९९२ आणि २००४ वगळता) तुमचा सहभाग होता. या दोन वर्षी पक्षाने तुम्हाला निवडणूक लढवण्याची अनुमती दिली नव्हती', असंही त्यांनी नमूद केलं होतं. 



'मी गेल्या ४६ वर्षांपासून तुमच्या मागेच धावतोय. आता मी काही १९ वर्षांचा तरुण नाही. माझीही दमछाक होऊ लागली आहे. (या निर्णयाबद्दल) मी खरंच तुमचा आभारी आहे', अशा अतिशय समर्पक आणि तितक्याच आपल्याशा वाटणाऱ्या ओळी लिहित सुषमा स्वराज यांच्या पतीकडून त्यांचं हे नातं सर्वांसमक्ष आणण्यात आलं होतं.