नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याची पुढे ढकलल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी आजच्या सुनावणीनंतर भाजप सरकारला थेट आव्हान दिले आहे. सरकारने राम मंदिराचा अध्यादेश काढून दाखवावाच, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकार अध्यादेश का काढत नाही, प्रत्येक वेळी ते अध्यादेश काढण्याची धमकी देत असतात, टॉम, डिक अँड हॅरी असलेल्या भाजपा, आरएसएस, विहिंप अशा धमक्या देत असतात. तुमच्याकडे सत्ता आहे. मी तुम्हाला आव्हान करतो की, अध्यादेश काढून दाखवा, अशा शब्दांत ओवैसींनी भाजपला डिवचले आहे. 


त्यामुळे आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


तत्पूर्वी भाजपचे नेते विनय कटियार यांनी अयोध्या खटला लांबणीवर टाकण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. अयोध्या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यामागे काँग्रेसचा हात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल लागू नये, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण यांच्यामार्फत दबाव निर्माण करून खटल्याची तारीख पुढे ढकलली जात असल्याचा आरोप कटियार यांनी केला.