नवी दिल्ली: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रवीण कक्कड यांच्या घरावर शनिवारी रात्री तीन वाजता आयकर विभागाने छापा टाकला. प्राथमिक माहितीनुसार, कक्कड यांच्या इंदुरमधील घरावर ही धाड पडली. आतापर्यंत कक्कड यांच्या घरातून ९ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दिल्ली आयकर विभागाने ही कारवाई केली. प्रवीण कक्कड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, रतलाम जाभुआ मतदारसंघातील खासदार कांतिलाल भुरिया यांच्याशी कक्कड यांचे निकटचे संबंध असल्याचे सांगितले जाते. प्रवीण कक्कर यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. कक्कर यांच्या घराची १५ अधिकारी झाडाझडती घेत आहेत. कमलनाथ मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर भुपेंद्र गुप्ता यांच्याजागी कक्कर यांची नियुक्ती करण्यात आली होती.  कक्कर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले होते.





सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशसह देशभरात ५० ठिकाणी आयकर खात्याने अशाप्रकराच्या धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अमिरा समूह, मोझर बेयर यांच्या कार्यालयांचाही समावेश आहे. याशिवाय, भुला, गोवा आणि अन्य ३५ ठिकाणांवर आयकर खात्याच्या विभागाकडून तपास सुरु आहे. या कारवाईत आयकर विभागाचे तब्बल ३०० अधिकारी सहभागी असल्याचे समजते.