नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकी दरम्यान राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एक संधी गमवायला तयार नाहीत. आपल्या पक्षाची योग्य बाजू मांडून विरोधी पक्षांकडे बोट दाखवण्याचे काम अनेक नेते करत आहेत. मात्र, भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाच्याच 'मैं भी चौकीदार' या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपमधील अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावासमोर 'चौकीदार' असा शब्द वापरलाय. परंतु, सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र आपल्या नावासमोर 'चौकीदार' हा शब्द वापरणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. याचं कारण देताना मात्र त्यांनी, 'मी ब्राह्मण आहे.... मी चौकीदाराला आदेश देईन की त्यानं काय करावं... त्यामुळे मी माझ्या नावासमोर चौकीदार लावू शकत नाही' असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. सुब्रमण्यम स्वामी यांच्या जातीवाचक वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:ला 'चौकीदार' म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार ही चोर हैं' अशी घोषणाबाजी केली होती. याला प्रत्यूत्तर देण्यासाठी भाजपाने 'मैं भी चौकीदार' या मोहिमेची सुरुवात केली होती. ही कॅम्पेन सोशल मीडियात हीट ठरलीय. या मोहिमेंतर्गत अनेकांनी आपल्या नावाआधी 'मैं भी चौकीदार' असे लावले आहेत. एवढेच नव्हे तर पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर आपल्या नावाअगोदर 'चौकीदार' असा शब्द जोडला आहे. 


याआधीही सुब्रमण्यम स्वामी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर जोरदार टीका करून चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्राची बिलकूल जाण नाही. आपला देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही ते भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे सांगतात, अशी टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधी केली होती.