चंदीगड: हिमाचल प्रदेशात ५१ वर्षांपूर्वी कोसळलेल्या भारतीय वायूदलाच्या एएन-१२ विमानाचे अवशेष हस्तगत करण्यात लष्कराला यश मिळाले आहे. हिमाचल प्रदेशातील बर्फाळ पर्वतरांगांमध्ये कोसळलेल्या या विमानाचे अवशेष शोधण्यासाठी वेस्टर्न कमांडकडून विशेष शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ जुलै रोजी सुरु झालेल्या या शोध मोहीमेत डोग्रा स्काऊटस आणि वायूदलाचे जवान सहभागी झाले होते. ७ फेब्रुवारी १९६८ रोजी वायूदलाचे एएन-१२ बीएल-५३४ हे विमान चंदीगडला परतत असताना रोहतांग पास येथून बेपत्ता झाले होते. या विमानात १०२ जवान होते. विमान कोसळल्यानंतर या सर्वांचा मृत्यू झाला होता. 


मात्र, गेल्या कित्येक वर्षांमध्ये पाच जणांचा अपवाद वगळता उर्वरित जवानांचे मृतदेह सापडू शकले नव्हते. त्यामुळेच आता लष्कराकडून उर्वरित मृतदेह शोधण्यासाठी २६ जुलैपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. 


यानंतर अवघ्या १३ दिवसांमध्ये ढाका ग्लेशियरच्या परिसरात शोध पथकाला विमानाचे अवशेष सापडले आहेत. यामध्ये विमानाचे इंजिन, तांत्रिक भाग, प्रोपेलर, इंधन टाकी, कॉकपिटचा दरवाजा अशा भागांचा समावेश आहे. याशिवाय, विमानातील सैनिकांच्या काही गोष्टीही शोध पथकाला सापडल्या आहेत. 


ढाका ग्लेशियरचा हा परिसर अत्यंत दुर्गम आहे. हिमस्खलनामुळे याठिकाणी मोठ्याप्रमाणात बर्फ साठलेला आहे. याशिवाय, तीव्र उतार आणि बर्फाला असणाऱ्या भेगांमुळे हा परिसर अत्यंत धोकादायक मानला जातो. 


हे विमान कोसळल्यानंतर अनेक वर्षे त्याचा ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे हे विमान शत्रूच्या हद्दीत कोसळले आणि भारतीय जवान शत्रूच्या तुरुंगात खितपत पडले आहेत, अशा अफवाही मध्यंतरी पसरल्या होत्या. 


मात्र, २००३ साली ढाका ग्लेशियरच्या परिसरात काही गिर्यारोहकांना या विमानातील काही सैनिकांची ओळखपत्रे सापडली होती. त्यावेळी हे विमान या परिसरात कोसळल्याचे निष्पन्न झाले होते. 


दरम्यान, आता नव्याने हाती घेण्यात आलेल्या शोधमोहीमेमुळे मृत सैनिकांच्या नातेवाईकांना आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी आपल्या आप्तेष्टांचे मृतदेह मिळण्याची वाट पाहत आहेत.