विमानांसाठी लवकरात लवकर दारुगोळा खरेदी करा; वायूदलाची मोदी सरकारकडे मागणी
रात्रीच्या वेळेत पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांचा सराव
नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने बालाकोट परिसरात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत दोन्ही बाजूंनी सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरु आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सीमारेषेलगत एफ-१६ विमाने तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, पाकने सीमारेषेलगत असणारे दहशतवाद्यांचे तळही केंद्रीय प्रशासनाच्या अखत्यारित असणाऱ्या भागात हलवण्यात आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या हालचालींनाही वेग आला आहे.
आगामी काळात युद्ध झाल्यास वायूदलाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. अशावेळी विमानांसाठी मोठ्याप्रमाणावर दारुगोळ्याची गरज आहे. सध्या वायूदलच्या ताफ्यात असणारी क्षेपणास्त्रे बऱ्याच काळापासून पडून आहेत. त्यामुळे या क्षेपणास्त्रांच्या आयुर्मानाचा मुद्दा ध्यानात घेणे गरजेचे आहे. याशिवाय, युद्धाच्यावेळी केेवळ संख्येपेक्षआ किती क्षेपणास्त्रांनी लक्ष्यभेद केला, हे अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे वायूदलाच्या ताफ्यातील क्षेपणास्त्रांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने हवेतून हवेत मारा करु शकणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होईल.
अभिनंदन वर्धमान यांनी मिगच्या साहाय्याने एफ-१६ पाडल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचा मोठा निर्णय
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतातील हवाई तळांचा विचार करुन पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांकडून सध्या युद्धाभ्यास सुरु आहे. यासाठी रात्रीच्यावेळी सराव होत असून पाकिस्तानची हवाई संदेशवहन यंत्रणाही कमालीची सतर्क आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सीमारेषेवर मिराज-२००० आणि सुखोई ३० एमकेआय ही विमाने तैनात करण्यात आली आहेत.