नवी दिल्ली: भारतीय हवाई हद्दीत शुक्रवारी एका पाकिस्तानी विमानाने प्रवेश केल्याची घटना घडली आहे. सरकारी सूत्रांकडून 'एएनआय' या वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी पाकिस्तानमधून एका विमानाने भारतीय हद्दीत प्रवेश केला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने तात्काळ या विमानाच्या मागावर पाठवण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर भारताच्या सुखोई ३० एमकेआय विमानांनी या विमानाचा पाठलाग करून हे विमान जयपूर विमानतळावर उतरवण्यास भाग पाडले. प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानी हद्दीतून आलेले हे विमान Antonov AN-12 जातीचे अवजड मालवाहू विमान आहे. हे विमान भारतीय हद्दीत का शिरले, हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. सध्या जयपूर विमानतळावर या विमानाच्या वैमानिकांची कसून चौकशी सुरु आहे. 




भारतीय वायदूलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्जियाच्या Antonov AN-12 हे विमान दुपारी दिल्लीकडे येण्यासाठी कराची विमानतळावरून हवेत झेपावले होते. मात्र, दिशा चुकल्यामुळे हे विमान उत्तर गुजरातमधून भारतीय हद्दीत शिरले. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द विमानांसाठी बंद केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांनाही वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे बंदी असतानाही अँटोनोव्ह एएन-12 हे मोठे मालवाहतूक विमान पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून भारतीय हवाई हद्दीत आलेच कसे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.