नवी दिल्ली : भारतीय हवाईदलातले अधिकारी विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाची वीर चक्रासाठी भारतीय हवाईदलाने शिफारस केली आहे. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे विमान पाडले होते. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना युद्धकैदी केले होते. मात्र भारत सरकारच्या दबावामुळे अखेर पाकिस्तानला अभिनंदन यांची सुटका करावी लागली. दरम्यान, हवाई दलाकडून ‘वीरचक्र’ या शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची काश्मीरमधील हवाई दलाच्या तळावरुन पश्चिम सेक्टरमधील हवाई तळावर नियुक्ती देण्यात येणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत शिरलेले पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत होते. देशासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सैन्य दलांतील जवानांना दिले जाणारे परमवीर चक्र, महावीर चक्र या दोन सर्वोच्च शौर्य पुरस्कारानंतर वीरचक्र हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी अभिनंदन यांची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर, बालाकोट येथे मिराज २००० लढाऊ विमानांसह हवाई हल्ले करणाऱ्या १२ पायलट्सचीही वायुसेना मेडलसाठी शिफारस करण्यात आली आहे.