अरुणाचलमधील हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची संख्या ७ वर...
अरुणाचल प्रदेशच्या तवांगजवळ भारतीय हवाईदलाचं एमआय-१७ या हेलीकॉप्टरला अपघात झालाय. या अपघातात हवाईदलाच्या सात जवानांना आपला जीव गमवावा लागलाय तर एकाची प्रकृती गंभीर आहे.
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या तवांगजवळ भारतीय हवाईदलाचं एमआय-१७ या हेलीकॉप्टरला अपघात झालाय. या अपघातात हवाईदलाच्या सात जवानांना आपला जीव गमवावा लागलाय तर एकाची प्रकृती गंभीर आहे.
वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी जवळपास सहा वाजल्याच्या सुमारास झाला. MI-१७ हे विमान या दरम्यान 'मेन्टेनन्स मिशन'वर होतं. हा अपघात कसा झाला? हे जाणून घेण्यासाठी वायुसेनेनं कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीचे आदेश देण्यात आलेत.
दुर्घटनास्थळ हे तवांगजवळ चीन सीमारेषेपासून १२ किलोमीटर अंतरावर खिरमू भागात आहे. या हेलिकॉफ्टरनं आर्मीसाठी एअर मेटेनन्सचं सामान घेऊन जाण्यात येत होतं.
उल्लेखनीय म्हणजे, ८ ऑक्टोबर रोजी 'एअरफोर्स डे' साजरा केला जातो... त्याच्या दोन दिवस अगोदरच हा अत्यंत भीषण अपघात घडलाय. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण ८ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान त्या अशाच MI-१७ V५ हेलिकॉप्टरनं प्रवास करणार आहेत. रशियन बनावटीचं MI-१७ सैन्य परिवहन हेलिकॉप्टर आहे.
गेल्या महिन्यातही २८ तारखेला भारतीय वायुसेनेचं एक प्रशिक्षणार्थी विमान आपल्या मिशन दरम्यान हैदराबादमध्ये दुर्घटनेला बळी पडलं होतं. मात्र, या दुर्घटनेत सुदैवानं पायलेटचा जीव वाचला. तसंच ५ सप्टेंबर रोजी सेनेचं अॅडव्हन्स्ड लाईट हेलिकॉप्टर लडाख भागात क्रॅश झालं होतं.