IAS Officer जेव्हा शेतकरी म्हणून खत विकत घ्यायला गेला... पुढे काय घडलं पाहा
एक जिल्हाधिकाऱ्याने खत विक्रेत्यांचा खरा चेहरा समोर आणला आहे.
विजयवाडा : विजयवाडामध्ये एक जिल्हाधिकाऱ्याने खत विक्रेत्यांचा खरा चेहरा समोर आणला आहे. त्यासाठी ते शेतकऱ्याच्या वेशात दुकानावर खत खरेदी करायला गेले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा दुकानदार खूप जास्त दरात खत विकत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे.
खरेतर विजयवाडामधील सब कलेक्टर जी सूर्या परवीन चंद यांना जेव्हा माहिती मिळाली की, Kaikaluru आणि Mudinepalli मंडळ येथील खत विकणारे दुकानदार शेतकऱ्यांना जास्त दरात खतं आणि युरीया विकत आहे, तेव्हा त्यांनी स्वत: या गोष्टीची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर ते शेतकऱ्याच्या वेशात दुकानात पोहोचले आणि शेतकऱ्यांप्रमाणेच खत आणि युरीया घेऊ लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, येथील अनेक दुकानदार Diammonium phosphate (DAP) आणि युरीयाला एमआरपीपेक्षा जास्त दरात विकत आहेत. एवढेच काय, तर ते विकत घेतलेल्या वस्तुंचे बिल देखील देत नव्हते. त्यांनी त्यांच्या गोदामात खतांचा साठा देखील करुन ठेवला होता.
@sushilrTOI ने या घटनेचे फोटो सोशल मीडियावर ट्वीट केले आहे. त्यात जिल्हाधिकारी शेतकऱ्याच्या वेशात लुंगीवर दुकानात उभे आहेत आणि सर्वसामान्य लोकांप्रमाणे खत आणि इतर साहित्य घेण्यासाठी दुकानात पोहोचले, तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार उघड झाला.
त्यानंतर त्यांनी त्या दोन्ही दुकानांना सीझ केले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. खरेतर हे दुकानदार 266.50 रुपयांचा युरीया 280 रुपयांना विकत होते. ज्यामुळे गरीब शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागत होते. त्याचबरोबर ते ग्राहकांकडून आधार डिटेल्स देखील घेत नव्हते, जे चुकीचे आहे.