`आयएएस` बनण्यासाठी त्यानं २२ लाखांचं पॅकेज बाजुला सारलं!
गलेलठ्ठ पगाराची नोकरीची संधी बाजूला सारत एका तरुणानं यूपीएससी परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला... आणि स्वत:वरचा हा विश्वास त्यानं सार्थही ठरवला.
मुंबई : गलेलठ्ठ पगाराची नोकरीची संधी बाजूला सारत एका तरुणानं यूपीएससी परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला... आणि स्वत:वरचा हा विश्वास त्यानं सार्थही ठरवला.
'हिंदुस्तान टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, हरियाणाच्या जिंदमधील हिमांशु जैन या तरुणानं हा धाडसी निर्णय घेतला होता. हिमांशुला ऑनलाईन रिटेलर 'अमेझॉन'कडून वार्षिक २२ लाखांचं पॅकेजची ऑफर मिळाली होती. परंतु, हिमांशुला यूपीएससी परीक्षा देऊन देशसेवेचा ध्यास लागला होता. उल्लेखनीय म्हणजे, तिसऱ्या प्रयत्नात हिमांशुनं यूपीएसससी मध्ये ४४ वा रँक मिळवलाय.
हैदराबादच्या 'इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी'मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर अमेझॉनमध्ये त्यानं इंटर्नशीप केली होती. त्यानंतर अमेझॉननं त्याला नोकरीची ऑफर दिली होती.
त्याला आरबीआयमध्ये मॅनेजरची नोकरीदेखील मिळाली होती परंतु, या नोकरीच्या संधीवरही त्यानं पाणी सोडलं आणि दिल्लीला येऊन परीक्षेसाठी तयारी केली. 'आयएएस' अधिकाऱ्यांकडे देशाला बदलण्याची शक्ती असते, यावर हिमांशूचा ठाम विश्वास आहे.