IAS अधिकाऱ्यांचा पगार किती असतो माहितीये? शिवाय मिळतात या विशेष सुविधा
IAS अधिकारी झाल्यानंतर सरकारकडून अनेक विशेष सुविधा मिळतात. जाणून घ्या काय आहेत त्या सुविधा?
पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा (UPSC) मानली जाते. आयएएस अधिकाऱ्याचे पद हे आपल्या समाजात अत्यंत प्रतिष्ठेचे पद मानले जाते. दरवर्षी देशभरातून लाखो उमेदवार UPSC ची परीक्षा देतात. पण मोजकेच उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होतात. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्येही फार कमी उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी बनतात.
IAS अधिकारी होण्यासाठी UPSC दरवर्षी नागरी सेवांसाठी परीक्षा घेते. यामध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया तीन स्तरांवर होते. यात सर्व प्रथम यूपीएससी पूर्व परीक्षा आहे. पूर्व परीक्षेतील यशस्वी उमेदवार मुख्य परीक्षेत भाग घेतात. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीच्या फेरीतून जावे लागते. मुलाखतीनंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो. यशस्वी उमेदवार IAS, IFS आणि IPS होतात.
अधिकारी झाल्यानंतर सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि प्रशासनाच्या विभागांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देशातील नोकरशाही रचनेत काम करण्याची संधी मिळते.
सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी
यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आयएएस म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेद्वारे देशातील नोकरशाही संरचनेत काम करण्याची संधी मिळते. सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि प्रशासन विभागांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. आयएएससाठी त्याच्या संपूर्ण सेवेतील सर्वोच्च पद म्हणजे कॅबिनेट सचिव या पदापर्यंत पोहोचण्याचे प्रत्येक आयएएस अधिकाऱ्याचे स्वप्न असतं.
अधिकाऱ्यांचा पगार
आयएएस अधिकाऱ्याला कॅबिनेट सचिव पदावर नियुक्त झाल्यानंतर सर्वाधिक पगार मिळतो. 7 व्या वेतन आयोगनुसार अधिकाऱ्याच्या पगाराबद्दल सांगायचे तर, त्याला अंतर्गत मूळ वेतन म्हणून 56 हजार रुपये मिळतात. याशिवाय आयएएस अधिकाऱ्यांना प्रवास भत्ता आणि महागाई भत्ता यासह इतर अनेक भत्तेही दिले जातात. एका आयएएस अधिकाऱ्याला दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जातो. दुसरीकडे, जर एखादा आयएएस अधिकारी कॅबिनेट सचिव पदापर्यंत पोहोचला तर त्याला दरमहा सुमारे अडीच लाख रुपये पगार मिळतो.
विशेष सुविधा
आयएएस अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळे पे बँड आहेत. अधिकाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त काही विशेष सुविधा उपलब्ध आहेत. जे त्यांना पदानुसार काही दिल्या जातात. यामध्ये कनिष्ठ स्केल, वरिष्ठ स्केल आणि सुपर टाइम स्केल सारख्या पे बँडचा समावेश आहे. मूळ वेतन आणि ग्रेड पे व्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्याला घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता देखील मिळतो.
अधिकाऱ्यांना याव्यतिरिक्त घर, स्वयंपाकी आणि घरातील कर्मचाऱ्यांसह अनेक सुविधा दिल्या जातात. पोस्टिंगच्या काळात आयएएस अधिकाऱ्याला दुसरीकडे बदली झाली तर त्याला तेथेही सरकारी घर दिले जाते. याशिवाय कुठेही ये-जा करण्यासाठी कार आणि ड्रायव्हरही उपलब्ध असतो. तुमचीही अधिकारी होण्याची इच्छा असेल तसेच या सर्व सुविधा आणि सन्मान कमवायचा असेल तुम्हीही चांगला अभ्यास करा आणि अधिकारी व्हा.