लग्न म्हटलं तर आपल्याकडे लाखो रुपये खर्च केले जातात. अनेकदा तर आपली ऐपत नसतानाही काहीजण कर्ज काढून मुलांची थाटामाटात लग्न लावतात. कोणीही नाराज होऊ नये म्हणून ओळखीतल्या प्रत्येकाला निमंत्रण दिलं जातं. यामुळे हॉल, सजावट, जेवण, वरात अशा थाटामाटात लग्न लावताना लाखो, करोडोंचं बिल होतं. साधं लग्न केल्यास लोक काय म्हणतील या भीतीपोटीही अनेकदा हा थाटमाट दाखवला जातो. पण भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी युवराज मरमट आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी पी मोनिका यांनी अत्यंत साधेपणाने लग्न करत समाजासमोर आदर्श घातला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज मरमट आणि पी मोनिका यांनी थाटामाटात लग्न करणं टाळत अत्यंत साधेपणाने विवाहबंधनात अडकले. दोघांनीही कोर्टात लग्न केलं. महत्त्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या पदावर आणि खर्च करण्याची ऐपत असतानाही दोघांनी फक्त 2 हजार रुपयात लग्न केलं. 


छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी युवराज मरमट यांनी आयपीएस अधिकारी मोनिका यांच्याशी लग्न केलं आहे. कोर्ट रुममध्ये त्यांनी एकमेकाला हार घालत सात जन्माच्या शपथा घेतल्या. अत्यंत साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता हा विवाहसोहळा पार पडला. एकमेकांना हार घातल्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित लोकांना मिठाई वाटली. लग्नाासठी लागणारे दोन हार, मिठाई आणि कोर्टाची फी मिळून फक्त 2 हजारात हे लग्न लागलं. 


2021 मध्ये UPSC मध्ये निवड होण्यापूर्वी, युवराज मरकट यांची IIT BHU मध्ये देखील निवड झाली होती. दुसरीकडे, आयपीएस अधिकारी पी. मोनिका यांनी पॅथॉलॉजीचा कोर्स केला आहे. याशिवाय फिटनेस, खेळासोबतच ब्युटी फॅशनमध्येही त्यांना रस आहे.


रायगडमध्ये पहिली पोस्टिंग


प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी युवराज मरकट यांची पहिली पोस्टिंग रायगडमध्ये झाली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर ते कार्यरत आहेत. यादरम्यान त्यांनी आपली प्रेयसी पी मोनिका यांच्याशी कोर्टातच साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या लग्नानंतर दोघेही मीडियाशी बोलणं किंवा जाहीरपणे काही भाष्य करणं टाळत आहेत. 


दोन्ही अधिकाऱ्यांच्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


जिल्हाधिकारी तरण प्रकाश सिन्हा यांनी नवविवाहित अधिकारी दाम्पत्याचे अभिनंदन केलं असून, शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच सीईओ जिल्हा जितेंदर यादव यांनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुश्री संतानदेवी जांगडे यांच्या हस्ते विवाह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.